(फोटो – सुशील राठोड )
पुणे – कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड यांचे काम चांगलेच आहे. त्यांनी राजीनामा दिला असला, तरी तो पक्षाने स्वीकारलेला नाही, असे नमूद करीत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांना “क्लीन चीट‘ दिली. त्यामुळे शहराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या प्रयत्नांना चाप बसण्याची शक्यता निर्माण झाली.
पत्रकार भवनात झालेल्या वार्तालापात कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदाबाबत चव्हाण यांनी स्पष्ट मत मांडले. ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर संघटनात्मक बांधणी सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन परिस्थितीची माहिती घेतली जात आहे. जो काम करतो त्याला संधी दिला जाणार आहे. पुण्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली. शहराध्यक्षपदाबाबतचा विषय या चर्चेत नव्हता. छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी तो पक्षाने स्वीकारलेला नाही. गेल्या दहा वर्षांत छाजेड यांनी चांगले काम केले आहे. जो काही निर्णय घ्यायचा असेल तो त्यांना विचारात घेऊन केला जाईल,‘‘ असे चव्हाण म्हणाले.कॉंग्रेसच्या पराभवानंतर छाजेड यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठी अनेकांनी मोर्चेबांधणी केली. कॉंग्रेस भवन येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन केले होते; परंतु प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी छाजेड यांच्या कामाचे कौतुक केल्याने, त्यांच्या जागेवर नवीन नियुक्ती होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाही.
गटबाजीचे प्रदर्शन
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांचे शनिवारी कॉंग्रेस भवनमध्ये स्वागत करताना घोषणाबाजी झाली. मात्र, यातून शहरातील पक्षसंघटनेमधील गटबाजीचे प्रदर्शन घडले.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यावर तब्बल सहा महिन्यांनी चव्हाण यांनी अधिकृतपणे शहरात पहिल्यांदाच दौरा केला. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल मेरिएटमध्ये सकाळी त्यांनी आमदार व माजी आमदारांची भेट घेतली. त्यानंतर ते कॉंग्रेस भवनमध्ये आले. त्या वेळी त्यांचे स्वागत करताना प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, माजी आमदार रमेश बागवे, शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, उपाध्यक्ष मुख्तार शेख यांचा जयघोष करणाऱ्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. त्याची दखल घेत चव्हाण यांनी भाषणात नापसंती व्यक्त केली. कार्यकर्त्यांना सांभाळा, त्यांच्या जिवावरच मी निवडून आलो, असे सांगत त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी विश्वजित कदम यांनी, शहरातील कॉंग्रेस कमजोर होत असल्याचे तीन महापालिकांमधील आकडेवारीतून दिसून येत आहे. त्यामुळे याबाबत जो निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या आणि जाहीर करा, असे आवाहन केले. त्याचीही दखल घेत चव्हाण यांनी, “ही बैठक म्हणजे, छाजेड यांच्या निरोपाची सभा नाही,‘ असे सांगत, याबाबतचा निर्णय सर्वांशी चर्चा करूनच घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, चव्हाण यांनी नगरसेवक व ब्लॉक अध्यक्षांची आज बैठक घेण्याचे जाहीर केले होते; परंतु ती झाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली होती.