पुणे
मुंबई-पुणे मार्गावरील निगडी नाक्याजवळ भरधाव कारने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात देहूरोड येथील आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेतील तीन विद्यार्थी ठार तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. काल रात्री एकच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालकाणे दारूच्या नशेत कार चालवून हा अपघात केल्याची प्राथमिक माहिती आहे कारचा चालक मयूर घुमटकर याला अटक करण्यात आली असून त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे.
किरण दिलीप दहाने (सातारा), संकेत कमलाकर समेळ (खोपोली), शुभम संभाजी भालेकर (पारनेर-अहमदनगर) अशी मृतांची नावे आहेत. हे तिघेही देहूरोड येथील आयआयटी एमआर या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी होते. अपघातात जखमी झालेल्या अविनाश बबन माने आणि शिनो जॉन विद्यायती या दोघांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे पाचही जण दोन दुचाकींवरून चहा पिण्यासाठी निगडी नाक्याजवळ आले होते. चहा घेतल्यानंतर घरी परतत असतानाच मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या कारने दोन्ही दुचाकींना मागून धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकी बरेच अंतर फरफटत गेल्या. अपघातानंतर तातडीने स्थानिक लोकांनी मदतकार्य केले मात्र तिघांचा जागीच मृत्यू झाला.