सातारा (जिमाका) : जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून व शेतकऱ्यांच्या सहभागातून सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ऑरगॅनिक उपक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती, सातारा येथे नुकताच पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जितेंद्र शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक गणेश घोरपडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चांगदेव बागल, उपाध्यक्ष रवि साळुंखे, पशुसंवर्धन सभापती शिवाजीराव शिंदे, पंचायत समितीचे सभापती कविता चव्हाण, आदी उपस्थित होते.
सेंद्रीय शेतीच्या प्रमाणीकणासाठी नोंदणी केलेल्या उत्पादक शेतकऱ्यांकडील शेतमालाची विक्री महिला बचत गटांमार्फत करण्यात येणार आहे. ही विक्री पंचायत समिती येथील डी.आर.डी.ए.कडील उभारण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत केलेला भाजीपाला, गुळ, काकवी, चवळी, गहू, ज्वारी, मोहरी, हरभरा, डाळ, कांदा घेवडा विक्रीसाठी उपलब्ध आहे तसे सेंद्रीय पद्धतीने आवळा ज्यूस, फेस पॅक, शाम्पू, साबण देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ऑरगॅनिक उपक्रम पंचायत समिती आवारात सुरु करण्यात आला असून हे विक्री केंद्र आठवड्यातून गुरुवार व रविवार या दोन दिवशी सुरु राहणार आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर क्षेत्रीय भेट देणे, शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे, सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरणासाठी मदत करणे व कृषी विद्यापीठांमध्ये शेतकऱ्यांच्या सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे.
ऑरगॅनिक उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
Date:

