स्त्रीवादी साहित्य संमेलनातील विशेष परिसंवादात सात लेखिकांनी उलगडला ‘मी का लिहिते?’चा प्रवास
स्त्रियांचे लेखन समाजाच्या जाणिवा बदलणारी कृती ठरावे : डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : अन्याय सहन होत नाही म्हणून, ग्रामीण स्त्रियांच्या जगण्याला आवाज देण्यासाठी, स्त्रीवादाविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी, स्वतःशी संवाद साधण्यासाठी आणि मूक प्राण्यांच्या वेदना समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही लिहितो, अशा विविध लेखनप्रेरणा स्त्रीवादी साहित्य संमेलनातील ‘मी का लिहिते?’ या विशेष परिसंवादातून समोर आल्या. वैयक्तिक अस्वस्थतेतून सुरू झालेले लेखन सामाजिक वास्तवाचे दस्तऐवजीकरण आणि परिवर्तनाची कृती कसे बनते, याचे अनुभव लेखिकांनी मांडले.
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कर्वेनगर येथे झालेल्या या सत्रात डॉ. गीताली वि. मं., डॉ. अदिती काळमेघ, शिल्पा कांबळे, अमृता खंडेराव, डॉ. प्रतिभा जाधव, डॉ. विनया जंगले आणि हीना कौसर खान सहभागी झाल्या होत्या. लेखिका व माध्यम अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनी सूत्रसंचालन केले.
संमेलनाच्या स्वागताध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मते, स्त्रीचे लेखन हे तिच्या वैयक्तिक अनुभवांबरोबरच समाजाने दुर्लक्षित केलेल्या वास्तवाची नोंद असते. ग्रामीण, श्रमकरी, बहुजन आणि विविध सामाजिक पार्श्वभूमीतील स्त्रिया लिहितात, तेव्हा साहित्यामध्ये आजवर पुरेसे स्थान न मिळालेल्या अनुभवांना आवाज मिळतो. अन्यायाला प्रश्न विचारणे, स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणे आणि इतरांच्या वेदना समजून घेणे या लेखनप्रेरणा समाजाची संवेदनशीलता वाढविणाऱ्या आहेत. स्त्रियांना निर्भयपणे व्यक्त होता येईल, असे वातावरण निर्माण केले पाहिजे. नवोदित लेखिकांना लेखनाबरोबरच प्रकाशन आणि वाचकांपर्यंत पोहोचण्याच्या संधीही मिळाव्यात. स्त्रियांचे लेखन समाजाच्या जाणिवा बदलणारी आणि समतेच्या दिशेने कृती घडविणारी शक्ती ठरावे, अशी त्यांची भूमिका आहे.
स्त्रीवाद म्हणजे माणुसकी आणि समतेचा विचार : डॉ. गीताली वि. मं.
स्त्रीवाद हा पुरुषविरोधी विचार नसून लोकशाही, सहिष्णुता, विविधता, अहिंसा आणि माणुसकी हा त्याचा गाभा आहे, असे डॉ. गीताली वि. मं. यांनी स्पष्ट केले. स्त्री, पुरुष आणि विविध लैंगिक ओळखी असलेल्या व्यक्तींनी व्यवस्थेने घडविलेले विषमतेचे साचे ओलांडून माणूसपणाकडे वाटचाल करावी, हा स्त्रीवादी विचाराचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
स्त्रियांनी अन्यायाला प्रश्न विचारले की स्त्रीवादी कार्यकर्त्यांवर कुटुंब मोडण्याचे आरोप केले जातात. मात्र, अन्यायाला विरोध करणे म्हणजे कुटुंबाला विरोध करणे नव्हे, असे त्यांनी नमूद केले. स्त्रीवादाविषयीचे गैरसमज दूर व्हावेत, त्याचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचावा आणि स्वतःशी स्वच्छंद संवाद साधता यावा म्हणून लेखन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. स्त्रियांनी राजकारणात अधिक संख्येने सहभागी होऊन समतेचा विचार पुढे नेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाबरोबर आत्मभानही आवश्यक : डॉ. अदिती काळमेघ
ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय करताना भेटलेल्या स्त्रियांचे संघर्ष आपल्या लेखनाची प्रेरणा ठरल्याचे डॉ. अदिती काळमेघ यांनी सांगितले. अत्यंत कठीण परिस्थितीतही ग्रामीण स्त्री खंबीरपणे उभी राहते, नकारात्मक अनुभव पचविते आणि उद्याच्या आशेवर जगते. तिची ही ताकद खूप काही शिकवून जाते, असे त्या म्हणाल्या.
शहरी स्त्रीकडे शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन असले तरी तेवढ्यानेच तिचे आत्मभान आणि स्वाभिमान जागृत होतो असे नाही. समाजाच्या नजरेतून स्वतःची ओळख शोधणे आणि सौंदर्यभानालाच आत्मभान समजणे या गोष्टी अस्वस्थ करतात, असे त्यांनी नमूद केले. अनुभव, निरीक्षण आणि चिंतन यांच्या संयोगातून आपल्या कविता, कथा आणि लेख आकाराला येतात. चुकीचे घडताना त्यावर बोलणे हे नागरिक म्हणूनही आपले कर्तव्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अन्याय सहन होत नाही म्हणून लिहिते : शिल्पा कांबळे
“अन्याय सहन होत नाही म्हणून मी लिहिते,” असे स्पष्ट उत्तर शिल्पा कांबळे यांनी दिले. वाचत असलेल्या साहित्यात आपल्या अनुभवांशी आणि बहुजन स्त्रियांच्या जगण्याशी पुरेशी ओळख पटत नव्हती. हे वास्तव मांडण्याच्या गरजेतून ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी लिहिल्याचे त्यांनी सांगितले.
लेखन हे विचार मांडण्याबरोबरच स्वतःला सावरण्याचे आणि जगण्याची ताकद मिळविण्याचे माध्यमही ठरले. काही व्यक्तिरेखांनीच आपल्याला कठीण काळात आधार दिला, असे त्या म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील मालिकेच्या लेखनातून त्यांचे विचार मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचविता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. आपली गोष्ट अधिक लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून पुस्तकांबरोबर दूरचित्रवाणी, नाटक आणि चित्रपट यांसारख्या माध्यमांकडे वळल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रामीण स्त्रियांचे दुःख त्यांच्या भाषेत सांगते : अमृता खंडेराव
ग्रामीण स्त्रियांच्या जगण्याची गोष्ट त्यांच्याच भाषेत सांगण्यासाठी आपण लिहितो, असे यवतमाळच्या अमृता खंडेराव यांनी सांगितले. समाजमाध्यमांवर विदर्भातील खाद्यसंस्कृती आणि स्त्रियांच्या जीवनशैलीविषयी लिहिताना काही शहरी वाचकांनी त्या वास्तवावर अविश्वास दाखविला. टीका आणि ट्रोलिंगचा सामना करावा लागल्यानंतर हे जग अधिक ठामपणे मांडण्याची गरज जाणवल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी भरण्यापासून स्वयंपाक आणि शेतीपर्यंत अनेक कामे स्त्री करते; परंतु स्वतःच्या गरजा आणि निर्णयांसाठी तिलाच दुय्यम स्थान मिळते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ग्रामीण स्त्रीच्या संघर्षातही आनंद शोधणारी आणि धैर्याने जगणारी बाजू समोर आणण्यासाठी विनोदी लेखनाचा मार्ग निवडल्याचे त्यांनी सांगितले.
विद्रोह म्हणजे सत्यावर ठाम राहणे : डॉ. प्रतिभा जाधव
विद्रोह म्हणजे विध्वंस नव्हे, तर सत्यावर ठाम राहणे आहे. हे सत्य मांडण्यासाठी आपण लिहितो, असे डॉ. प्रतिभा जाधव यांनी सांगितले. संत कवयित्रींपासून आधुनिक लेखिकांपर्यंतच्या वैचारिक परंपरेचा उल्लेख करून त्यांनी स्त्रियांच्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर भर दिला.
लेखन हीदेखील एक कृती आहे. त्यातून एखाद्या व्यक्तीच्या जाणिवेत बदल झाला, तिने स्वतःच्या स्वातंत्र्याचा आणि आत्मसन्मानाचा विचार केला तरी ते महत्त्वाचे यश आहे, असे त्या म्हणाल्या. शिक्षण आणि प्रत्यक्ष वर्तन यांत सुसंगती असली पाहिजे. शिक्षण घेऊनही चुकीला चूक म्हणण्याचे धैर्य नसेल तर त्या शिक्षणाचा उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यांनी सादर केलेल्या अनुवादित ‘चेटकिणी’ कवितेतून प्रश्न विचारणाऱ्या, निर्णय घेणाऱ्या आणि तडजोड नाकारणाऱ्या स्त्रियांकडे समाज कसा पाहतो, याचे चित्र उभे राहिले.
मूक प्राण्यांच्या वेदनांचे दस्तऐवजीकरण व्हावे : डॉ. विनया जंगले
प्राण्यांचे दुःख आणि पर्यावरणाची हानी लोकांना समजावी, या उद्देशाने लेखन करीत असल्याचे डॉ. विनया जंगले यांनी सांगितले. पुरुषप्रधान मानल्या गेलेल्या पशुवैद्यकीय आणि वन्यजीव उपचारांच्या क्षेत्रात महिला म्हणून सुरुवातीला स्वतःची क्षमता वारंवार सिद्ध करावी लागल्याचे अनुभव त्यांनी मांडले.
प्रत्यक्ष कामातून दिसणारे प्राण्यांचे वर्तन, त्यांचे भावविश्व आणि त्यांच्या वेदना यांची नोंद राहिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. वन्यप्राण्यांच्या उपचारांदरम्यान आलेल्या वेदनादायी प्रसंगांबरोबरच आपण वाढविलेल्या बिबट्याने अनेक वर्षांनंतरही ओळख दाखविल्याचा भावनिक अनुभव त्यांनी कथन केला. प्राण्यांना जवळून समजून घेतलेले अनुभव समाजापर्यंत पोहोचविणे ही आपल्या लेखनाची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले.
काही विषय आपण निवडतो; काही विषय आपल्याला निवडतात : हीना कौसर खान
लिहिण्याच्या आवडीतून पत्रकारितेकडे वळले; मात्र या प्रवासात आपल्या धार्मिक ओळखीबद्दल समाजाच्या अपेक्षा आणि दृष्टिकोन नव्याने जाणवले, असे हीना कौसर खान यांनी सांगितले. मुस्लिम समाजाचे माध्यमांतील मर्यादित आणि ठरावीक चित्रण अस्वस्थ करणारे होते. त्यापलीकडील माणसे, त्यांचे अनुभव आणि समाजजीवन मांडण्याची गरज वाटल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्यवस्थेतील विसंगती, नात्यांतील व्यवहार, प्रेम आणि सहवासाचा अभाव यांविषयीची अस्वस्थता लेखनाला प्रवृत्त करते, असे त्या म्हणाल्या. पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणाचे वार्तांकन करताना आलेल्या अनुभवांनी अशा विषयांवर सातत्याने लिहिण्याची गरज अधिक तीव्र केली. त्या काळातील अनुभवांची नोंद राहिली नाही तर पुढे त्यांचा विपर्यास होऊ शकतो. म्हणून लेखन हे दस्तऐवजीकरणही आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
स्त्रियांच्या लेखनाभोवतीची बंधने मोडण्याचे आव्हान : मुक्ता चैतन्य
समाजमाध्यमांमुळे अनेक स्त्रियांना स्वतःचे अनुभव आणि विचार मोकळेपणाने मांडण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याचे मुक्ता चैतन्य यांनी सांगितले. तरीही स्त्रीने काय लिहावे, काय लिहू नये आणि कोणते शब्द वापरावेत याबाबतची सामाजिक बंधने कायम आहेत. ही बंधने ओलांडण्याबरोबरच स्त्रियांच्या लेखनाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलणे हे पुढील मोठे आव्हान असल्याचे त्यांनी समारोपात नमूद केले.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या चौदाव्या नांदी संमेलनांतर्गत झालेल्या या स्त्रीवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी डॉ. छाया महाजन होत्या. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले. महाराष्ट्र साहित्य परिषद, समर्थ युवा फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग आणि स्त्री आधार केंद्र यांच्या सहभागातून संमेलन झाले.

