पुणे- शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र सामनाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीतील सगळा रोख भाजपविरोधी व मराठी अस्मिता जागवणाराच आहे. ‘‘होय, मी जबाबदारीपासून पळणार नाही. जनतेचा निर्णय सर्वोच्च आहे. एक सामान्य माणूस जर का पंतप्रधान बनू शकतो तर जनतेने ठरवले तर ‘ठाकरे’ मुख्यमंत्री का नाही बनू शकणार? असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले. ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढाई आहे. महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणून हिणवणार्यांना जनता पूर्ण गाडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र आज एकवटला आहे. महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणणार्यांविरुद्ध तो पेटून उठला आहे. हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. शिवसेनेला कुणाचीही बटीक बनविणार नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राची जनता ठरवेल. दिल्ली ठरवू शकत नाही. ही लढाई शिवसेना महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणून जिंकणारच आहे, असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत व्यक्त केला आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’साठी कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. जी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी भाजप, अखंड महाराष्ट्र, मराठी अस्मिता, दिल्लीपुढे कदापी झुकणार नाही असा रोख ठेवत मराठी माणसांना जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.
काय आहे हि मुलाखत ? – जशीच्या तशी वाचकांसाठी देत आहोत ।
प्रश्न- ही लढाई नक्की कुणाबरोबर आहे? कारण महाराष्ट्रात महाभारत सुरू आहे.
उद्धव- युद्ध जर का आपण मानलं तर राजकीय युद्ध हे राजकीय पक्षांबरोबर आहे. राजकीय पक्षांच्या नाकर्तेपणामुळे जे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नांशी आणि खासकरून महाराष्ट्राच्या अस्मितेची ही लढाई आहे.
प्रश्न- म्हणजे काय?
उद्धव- महाराष्ट्राच्या अस्मितेला आजपर्यंत जे कोणी उंदीर म्हणाले, त्यांचा पूर्ण नि:पात महाराष्ट्राने केलेला आहे. पुन्हा एकदा बर्याच वर्षांनंतर कुणाचे तरी धाडस हे महाराष्ट्राला उंदीर म्हणायचं झालेलं आहे आणि तो जो राग आहे तो मला पावलोपावली दिसत होता. सभेतील गर्दीतून ज्या काही घोषणा होत होत्या त्या घोषणा अंगावरती रोमांच उभ्या करणार्या होत्या. लोक पेटलेत आता. महाराष्ट्राचा अपमान कधीच सहन केला जात नाही.
म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जे चित्र दिसलं. संपूर्ण महाराष्ट्र अपमानाविरोधात एकवटला होता.
प्रश्न- होय. तसाच महाराष्ट्र आज एकवटला आहे. महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणणार्यांविरुद्ध तो पेटून उठला आहे. हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. मुळात महाराष्ट्राला ‘उंदीर’ म्हणण्याचं हे धाडस झालंच कसं?
उद्धव- याचं कारण ज्यांना महाराष्ट्राच्या शौर्याची कल्पना नाही. तेच असं धाडस करू शकतात. मध्ये असं बोललं गेलं की, शिवाजी महाराज ही कुणाची खासगी प्रॉपर्टी नाही. त्याच बरोबरीने आमचे शिवाजी महाराज म्हणजे बाजारात उघड्यावर पडलेला मालसुद्धा नाही की कधीही जावा आणि विकत घ्यावा. पैसे फेकावे आणि विकत घ्यावा असा उघड्यावर पडलेला मालसुद्धा नाहीय. शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या रोमारोमांत भिनलेला एक विचार आहे. एक तेज आहे आणि शिवाजी महाराज हे दैवत आहेत.
प्रश्न- पंचवीस वर्षांची शिवसेना-भाजपची युती तुटली
उद्धव- तुटली नाही, भाजपने ती तोडली.
प्रश्न- हे आपल्यासाठी वेदनादायक आहे काय?
उद्धव- नक्कीच. मी परवाच्या सभेत अटलजींच्या चार ओळी ऐकवल्या. ती एक भावना होती, युतीच्या मागची. त्या युतीच्या मागे खुर्च्यांचे राजकारण नव्हते. सत्तेची स्वप्नं नव्हती. आपला देश, हिंदुत्व, महाराष्ट्र या एका पवित्र भावनेतून झालेली ती युती होती. त्याच्यामध्ये कधी सत्तेचे खेळ आणि चाळे हे लक्षात घेतले गेले नव्हते. आता पिढी बदललेली आहे. माझ्यावरती घराणेशाहीचे आरोप झाले. ठीक आहे नं. घराणेशाहीबरोबर घराण्याची परंपरा जी आहे, जो वारसा आहे तो मी पुढे चालवतोय आणि ते संस्कार घेऊन मी पुढे चाललेलो आहे. अशावेळेला आता जो बुद्धिबळाचा खेळ सुरू झालेला आहे तो क्लेशदायक आहे.
दोन-पाच जागांसाठी ‘महान’ महायुती तुटावी हेसुद्धा क्लेशदायकच आहे.
प्रश्न- होय, पण दोन-पाच जागा नक्की कुठून मोजणार तुम्ही? मोजायला कुठून सुरुवात करणार? १८ जागा दिल्यानंतर पुन्हा दोन-पाच जागा हव्यात. म्हणजे पंचविसेक जागा द्यायच्या आम्ही. आधी तर ते ३४ जागा शिवसेनेकडून मागत होते. शेवटी शिवसेना ही शिवसेना आहे हो.
तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे?
उद्धव- शिवसेना ही शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून, शिवसैनिकांनी रक्त सांडून, मर मर मेहनत करून, महाराष्ट्राच्या हितासाठी निर्माण केलेली ही संघटना आहे. कुणाला गुलाम म्हणून किंवा बटीक बनून राहण्यासाठी शिवसेनेची निर्मिती नाही झालेली. आम्ही तुमचे मित्र बनून राहू इच्छित होतो, गुलाम बनून नाही राहणार. मित्र म्हणाल तर मैत्रीसाठी आम्ही काहीही करू. प्रेमाखातर काही करू पण बटीक बनून गुलाम म्हणून फक्त सत्तेसाठी आम्ही तुमची पालखी वाहणार नाही. शिवसेनेला कुणाचीही बटीक बनविणार नाही.
प्रश्न- मित्रच जेव्हा शत्रू बनून उभा ठाकतो व वार करतो तेव्हा तुमची भूमिका काय असते?
उद्धव- दुर्दैव आहे, पण शेवटी लढाई तर जिंकायलाच पाहिजे. आजपर्यंत त्यांना शिवसेनाप्रमुखांनी संकटकाळात सांभाळलं. पंचवीस वर्षे फक्त संकटं आणि संकटंच झेलली. मग ते तुमचे चांगले दिवस. ‘अच्छे दिन’ फार थोडे आले वाट्याला. साडेचार वर्षांचं राज्यातलं सरकारसुद्धा ओढाताणीचं सरकार होतं. केंद्रामध्ये अटलजींचं सरकार होतं तेव्हा चांगली अशी युती होती. बर्याचदा अटलजींचे फोन यायचे बाळासाहेबांना. मग बाळासाहेब फोन करायचे अटलजींना. प्रत्येक वेळेला काही कामच नव्हती. एका उंचीवरची ती नेतेमंडळी होती. एकमेकांशी विचारपूस आणि विचारविनिमय व्हायचा. सल्लामसलत व्हायची. शिवसेनाप्रमुख कधी दिल्लीला गेले नव्हते, पण अटलजी कधीही त्यांना फोन करीत होते. ते एक वेगळं नातं होतं.
प्रश्न- तुम्हाला आज अटलजी आणि आडवाणी यांची आठवण येते का?
उद्धव- येतेच ना. आज दुर्दैवाने अटलजी तर कारभार पाहू शकत नाहीत. आडवाणींकडे आता काय कारभार शिल्लक राहिलाय मला त्याची कल्पना नाही, परंतु युतीची बोलणी ज्यावेळा युती तुटण्याच्या दिशेने जाताहेत अशी लक्षणं दिसायला लागली तेव्हा मी आडवाणीजींना फोन केला. त्यांना मी सांगितलं की, आडवाणीजी जिस तरीके से बातचीत चल रही है, मुझे नहीं लगता की बीजेपी युती कायम रखना चाहती है. तर ते पण उडाले. म्हणाले, नहीं नहीं शिवसेना के साथ तो युती बने रहना चाहिए. कौन कर रहा है आप से चर्चा? मैं किसके साथ बात करू? मी म्हणालो, आडवाणी साब मैंने आपको परेशान करने के लिए फोन नही किया है। फक्त मी एवढंच सांगायला फोन केलाय की, दुर्दैवाने असं घडलंच आणि जर का भाजपने युती तोडली तर आप मुझे माफ करिए. आप लोगों ने बनायी हुई ‘युती’ मैं आगे नहीं ले जा सकता आणि दुर्दैवाने तसंच घडलं.
परश्न- का घडलं? हा प्रश्न आहेच.
उद्धव- भाजपने युती तोडली. कारण काय हे त्यांचं त्यांनाच माहीत. कदाचित त्यांना महाराष्ट्र तोडायचा असेल. त्यांना असं वाटलं असेल की आता केंद्राप्रमाणे इकडेही आपलं एकहाती सरकार येतेय. आपण बहुमताच्या जोरावरती महाराष्ट्राची फाळणी करू. विदर्भाचा तुकडा पाडू. अशा वेळेला सरकारमध्ये शिवसेना नसलेली बरी, असं त्यांना वाटलं असेल. पण आता त्यांच्या लक्षात आलंय की त्यांचं सरकार येतच नाही. अखंड महाराष्ट्र टिकविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र हा शिवसेनेलाच मतदान करेल.
प्रश्न- बाळासाहेबांची कमतरता जाणवतेय का?
उद्धव- मी नेहमीच सांगतोय की, कमतरता ही केवळ शिवसेनाप्रमुख म्हणून नाही तर आई-वडील हे आईवडील असतात. प्रत्येक मुलाला ही त्याच्या आईवडिलांची कमतरताही जाणवतेच. लढताना आता मला कमतरता जाणवत नाही. कारण त्यांनी मला पुरेसे आशीर्वाद दिले आहेत, पण आज जे धाडस मी केलेलं आहे, जो स्वाभिमान मी दाखवलेला आहे, तो बघायला ते हवे होते हे नक्कीच. मला आतून असं वाटतंय की त्यांनासुद्धा आपल्या पुत्राचा अभिमान वाटला असता की, हा झुकला नाही. हे तत्त्व त्यांनी आयुष्यभर पाळलं. मैत्रीसाठी वाट्टेल ते करीन, पण मी झुकणार नाही. तोच बाणा कायम ठेवून मी पुढे चाललेलो आहे. आणि त्यांना अभिमान वाटला असता की आपली शिवसेना आपला पुत्र अशीच पुढे नेतोय.
प्रश्न- भारतीय जनता पक्षाचे अनेक मित्र होते ते दूर झाले.
उद्धव- दूर झाले की गरज संपल्यावर दूर केले? ते पहा.
प्रश्न- होय. दूर केले, पण भाजपशिवाय त्यांनी एकाकी लढून राज्याराज्यात स्वबळावर सत्ता आणली.
उद्धव- बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. तशीच एकहाती सत्ता महाराष्ट्रात शिवसेना मिळविणार आहे. महाराष्ट्रात मला तेच चित्र दिसतंय.
प्रश्न- एकाकी लढण्याचा रोमांचक अनुभव तुम्ही घेताय.
उद्धव- होय, नक्कीच हा मोठा अनुभव आहे. हे मी संकट नाही मानत, तर संधी मानतोय. नवीन पटनायकांनी तर पाच-दहा वर्षांपूर्वीच भाजपशी युती तोडलीय. असेच चाळे भाजपने त्यांच्याशी केले. युती तोडून पटनायकांनी ओडिशा काबीज केले. आतासुद्धा ऐन मोदी लाटेत ते पुन्हा प्रचंड बहुमताने सत्तेत आले. ममता असतील, जयललिता असतील, मायावती असतील. हार-जीत झालीय. जयललिता आता तुरुंगात आहेत. मायावती आता हारल्यात. पण आधी मायावती एकट्याच लढल्या ना. ममता एकट्याच लढल्या, पण त्या महिला असून जिंकलेल्या आहेत. चंद्राबाबू आज पंधरा वर्षांनंतर पुन्हा सत्तेवर आले. त्यांचे राजकारण असे चाललंय की प्रादेशिक पक्षांना नाहीसे करायचं.
प्रश्न- म्हणजे राज्याची अस्मिताच नष्ट करायची.
उद्धव- राज्यांची अस्मिता नष्ट करायची आणि दिल्लीतून कठपुतळ्यांसारखी माणसं नेमून दिल्लीतून केंद्रशासित असल्याप्रमाणे राज्यांचा कारभार करायचा. अशा दिशेने यांची पावलं पडत आहेत.
प्रश्न- कॉंग्रेसचे हेच धोरण होतं. राज्यातील नेत्यांना मानायचे नाही.
उद्धव- संपवूनच टाकायचं. कठपुतळीचे खेळ दिल्लीत बसून करायचे. त्यांना सर्व राज्यांच्या मुख्यमंत्रीपदी आपल्या कठपुतळ्याच पाहिजेत.
प्रश्न- महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय संदेश द्याल?
उद्धव- महाराष्ट्राची जनता शहाणी आहे. शिवराय आणि बाळासाहेबांच्या विचाराने भारलेली आहे. भीमशक्ती सोबत आहे. कारण डॉ. आंबेडकर हे तर दैवतच आहे. त्यामुळे महाराष्ट्र वेड्यावाकड्या दिशेने जाणार नाही. एकही भगवं मत फुटणार नाही याची काळजी महाराष्ट्र घेईल. अनेकजण मला विचारताहेत की ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे काय? माझ्या कसल्या अस्तित्वाची लढाई? मी उभा राहिलोय तो महाराष्ट्राच्या जनतेच्या भरवशावरती उभा राहिलोय. संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ पंतप्रधानांसह इकडे प्रचार करून गेले. आता कोण कुठे कुठे गेलेत ते फोन करून बघा. महाराष्ट्राच्या अडल्यानडल्याला पुन्हा इकडे येतात काय पहा. कोणीही येणार नाही. जेव्हा दुष्काळ पडतो तेव्हा कोणी येत नाही. संकट येतं तेव्हा कोणी येत नाही. येतात आणि आपले घोड्यावर बसून निघून जातात. परंतु आपण इथलेच आहोत. शिवसेनेला थोडीथोडकी नाही तर ४८ वर्षं झालेली आहेत. शिवसेना हा इथल्या मातीत जन्माला आलेला पक्ष आहे. तो कोणत्याही पक्षातून तुटून फोडून शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेला नाही. मराठी माणसांच्या आणि हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी जन्माला आलेला हा पक्ष आहे. अशा वेळेला जे आपल्या अस्मितेच्या आणि महाराष्ट्राच्या मुळावर येताहेत, विकासाच्या बुरख्याआडून महाराष्ट्र तोडण्याची स्वप्नं घेऊन येताहेत त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल.
रश्न- मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांबरोबर इतर भाषिक मोठ्या प्रमाणावर आहेत. विशेषत: गुजराती बांधव.
उद्धव- होय. गुजराती बांधव, माता-भगिनी आमच्याबरोबर आहेतच. गुजराती तर आहेतच. मारवाडी, जैन, शीख समाज, हिंदी भाषिक. शीख समाज तर संपूर्णपणे घरी आला होता. त्यांचे ते पुजारी येऊन त्यांच्या भाषेत प्रार्थना करून त्यांनी मला आशीर्वाद दिले आहेत. युती तोडली हे गुजराती बांधवांना आवडलेलं नाहीय. हिंदुत्वासाठी ते ठीक झालं नसल्याची त्यांची भावना आहे. त्यांनी मला वचन दिलंय, ‘साब आप चिंता मत करिए, मुंबई में तो हमे शिवसेना चाहिए.’ याचं कारण असं की मोदींना मराठी माणसानं पण मतं दिलीत. मोदींना मीसुद्धा मत दिलंय. तुम्हीसुद्धा मत दिलंय. त्यावेळेला आपण हे बघितलं नाही की गुजराती, मराठी. ते काही जरी असलं तरी येथील गुजराती समाजातील भावना आहे की, आम्हाला शिवसेनाच पाहिजे. कारण मुंबईत आम्हाला फक्त शिवसेनाच मदतीला येते. बर्याच ठिकाणी ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजसुद्धा मला पाठिंबा देतोय. हे एक वेगळं घडतंय यावेळेला.
प्रश्न- तुमचं मिशन काय?
उद्धव- माझं मिशन महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्य बनवणं. ते व्हिजन मी दाखवलेलं आहे. माझं तर आव्हान आहे. इतर सर्व पक्षांनी त्यांचे जे काही जाहीरनामे असतील, दृष्टीपत्रे असतील. घेऊन माझ्यासमोर यावं. मी त्यांच्यासोबत येतो. जनतेसमोर जाऊ. मी माझ्या तयार असलेल्या योजना दाखवतो. तुमच्या तयार असल्याच तर योजना दाखवा. एकही गोष्ट अशी नाही की मी जी हवेत बोललेलो आहे.
प्रश्न- महाराष्ट्राच्या जनतेला तुम्हाला मुख्यमंत्रीपदी बसलेलं पाहायचंय.
उद्धव- ही त्यांची इच्छा! शेवटी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राची जनता ठरवेल. दिल्ली ठरवू शकत नाही.
प्रश्न- पण महाराष्ट्राला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेले पाहायचेत.
उद्धव- आजपर्यंत असं म्हटलं जातंय की ठाकरे घराण्यात कोणी निवडणूक लढलेलं नाही. बरोबर आहे ते. पण ठाकरे कधी जबाबदारी सोडूनही पळालेले नाहीत. त्यामुळे जनता ही सर्वोच्च आहे. सर्वसामान्य माणसाची ताकद फार मोठी आहे. याच सामान्य माणसाने अनेकांना सत्तेवर बसवले आणि सत्तेवरून उतरविलेदेखील आहे. जनतेचे पाठबळ मिळाले तर सामान्य माणूसही लोकशाहीत सर्वोच्चपदी बसू शकतो. नरेंद्र मोदी यांनी जीवनाची सुरुवात चहा विकण्यापासून केली. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. तरीही त्यांनी आधी गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता पंतप्रधानपदापर्यंत झेप घेतली ती सामान्य माणसाच्या पाठबळावरच. या देशाने कष्टकर्यांचा नेहमीच सन्मान केला आहे. शिवसेनादेखील कष्टकरी-कामकर्यांच्या पाठीशी कायम उभी राहिली आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी-कामकरी जनतेनेही शिवसेनेला नेहमी भरभरून प्रेमच दिले आहे. आताही महाराष्ट्रातील जनता शिवसेनेच्या बाजूने उभी राहणार याविषयी आम्हाला खात्री आहे. सामान्य माणसातून आलेल्या नरेंद्र मोदींना याच जनतेने पंतप्रधान केले. तेव्हा जनतेने ठरवले तर ठाकरे मुख्यमंत्री का नाही बनू शकणार?
ऊठ मर्हाठ्या ऊठ, ‘उंदीर’ म्हणणा-यांना धडा शिकव- उद्धव ठाकरे
Date: