‘सारेगमप लिटील चैम्प’ म्हणून एकेकाळी गाजलेली गायिका आर्या आंबेकर आता लवकरच रसिक प्रेक्षकांना नायिकेच्या रुपात रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. गायन क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर आर्याने आता अभिनयक्षेत्रात पदार्पण केले असून ‘रंगीला रे’ या आगामी चित्रपटात ती आपल्या अभिनयाचे रंग दाखविणार आहे. मुळची नागपूरची असलेली आर्या आंबेकर आता गायिकेबरोबरच ‘नायिका’ म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत आपले यश अजमावून पाहण्यास सिद्ध झाली आहे. २००८ साली झी मराठी प्रस्तुत ‘सारेगमप लिटील चैम्प’ स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोंचलेल्या आर्या आंबेकर हिने आपल्या बहारदार गायनाने हरिहरन, श्रेया घोसाल, महालक्ष्मी अय्यर यांच्यासारख्या दिग्गजांना मंत्रमुग्ध केले होते. या स्पर्धेनंतर गोड गळ्याची गायिका म्हणून नावारूपास आलेल्या आर्याने ‘पंचरत्न’, ‘जय हरी विठ्ठल’, ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’, ‘आठवा स्वर’, ‘मराठी अभिमान गीत’, ‘गीत तुझे गाता गाता’, ‘खाऊचा गाव’, ‘माझ्या मातीचे गायन’, ‘दिवा लागू दे रे देव’, ‘मला म्हणतात आर्या आंबेकर’ आदी अल्बम मधून रसिक श्रोत्यांनाही तृप्त केले. ”२६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आर्याने गायलेल्या ” ए मेरे वतन के लोगो …” या अमर गीताने अनेक उपस्थितांचे डोळे पाणावले होते. तसेच थोर समाजसेवक बाबा आमटे यांच्या महान कार्याचे वर्णन करणारा आर्याच्या आवाजातील अल्बमला रसिकांच्या पसंतीची पावती मिळाली होती. आर्याच्या आवाजातील ‘हम और तुम’ हा हिंदी गीतांचा अल्बमही खुप गाजला होता. याशिवाय आर्याने ‘लेट्स गो बैक’, ‘कळी’ योद्धा’, ‘बालगंधर्व’, ‘रमा माधव’, ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ आदी चित्रपटात गायनही केले आहे. सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचे शीर्षकगीतही आर्यानेच म्हटले आहे. गायिका म्हणून गाजलेली आर्या ‘नायिकाही होणार याची चुणूक ‘सारेगमप लिटील चैम्प’ या स्पर्धेतच पाहायला मिळाली होती. त्याप्रमाणे आर्यांचे हे स्वप्न ‘रंगीला रे’ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रत्यक्षात उतरणार आहे. आपल्या या पहिल्याच चित्रपटाबाबत आर्या खूपच उत्सुक आहे. चित्रपटात नायिका म्हणून मला यापूर्वीच ऑफर आल्या होत्या मात्र मी चांगल्या भूमिकेच्या शोधात होते आणि ‘रंगीला रे’ चित्रपटाच्या निमित्ताने मला चांगली भूमिका मिळाली व नायिका म्हणून अभिनयात कोणतीही उणीव राहू नये यासाठीची मी आता दक्षता घेत आहे असे आर्याने मोठ्या उत्साहाने सांगितले. नागपूरच्या ‘सेव्हन हॉर्स एन्टरटेन्मेंट’ या निर्मिती संस्थेतर्फे ‘रंगीला रे’ चित्रपट तयार करण्यात येत असून त्याचे दिग्दर्शन पराग भावसार करीत आहेत. याशिवाय कथा-पटकथाही त्यांनीच लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती अमित धुपे करीत असून ‘तानी’ चित्रपटाचे निर्माते अजय ठाकूर हे या चित्रपटाचे क्रिएटिव्ह हेड आहेत. प्रवीण कुंवर यांनी चित्रपटाला संगीत दिले असून ‘रंगीला रे’ चे लवकरच चित्रीकरण सुरु होत आहे.
आर्या आंबेकर आता नायिकेच्या रुपात रुपेरी पडद्यावर
Date: