‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो’
चित्रपटगृहाच्या रूपेरी पडद्यावर आपल्या हिरोची कथा ते अवाक् होऊन बघत होते… प्रत्येक प्रसंगाशी ते स्वतःला जोडत होते… त्याच्यासोबत हसत होते, त्याचा संघर्ष बघून भावूक होत रडतही होते.. चित्रपट संपला आणि त्या सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आपल्या या नायकाचं कौतुक केलं… चित्रपटगृहातील ही भारावून गेलेली प्रेक्षक मंडळी होती हेमलकसा व आनंदवनातील शेकडोंच्या संख्येचा आमटे परिवार आणि पडद्यावरील नायक होता,डॉ. प्रकाश बाबा आमटे. प्रसंग होता त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ या चित्रपटाच्या प्रिमीयरचा. एस्सेल व्हिजन प्रस्तुत आणि समृद्धी पोरे निर्मित दिग्दर्शित ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो’ हा चित्रपट १० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. मुंबई, पुणे येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. त्यानंतर १३ ऑक्टोबरला नागपूरमध्येही या चित्रपटाचा विशेष प्रिमीयर सोहळा रंगला तोही लोकबिरादरी प्रकल्प आणि आनंदवन परिवारातील सदस्य आणि आमटे कुटुंबियांच्या उपस्थितीत यावेळी डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटें, डॉ. अनिकेत आमटे, डॉ. समिक्षा आमटे, आरती आमटेंसह चित्रपटातील स्थानिक कलाकार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हयातील हेमलकसा येथील आदिवासींना आरोग्य सुविधा देण्याचं शिक्षणाच्या माध्यमातून आत्मभान जागृत करत मुख्य प्रवाहात आणण्याचं काम गेल्या ४० वर्षांपासून डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि सहकारी अविरतपणे करत आहेत. त्यांचा हाच जीवनप्रवास मांडणारा डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो चित्रपट मागील आठवड्यात प्रदर्शित झाला. पहिल्या तीनही दिवशी चित्रपटाने बहुतेक सर्वच ठिकाणी हाऊसफुल्लचे बोर्ड झळकवले. विशेषतः तरूण वर्ग या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर हजेरी लावत आहे आणि सोशल नेटवर्क साइट्सवरही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. प्रत्येकजण चित्रपटाबद्दल भारावून बोलत आहे. काहीशा अशाच वातावरणात नागपूरचा प्रिमीयर सोहळाही पार पडला. यासाठी विशेष आमंत्रित होते आनंदवनातील सदस्य आणि हेमलकसामधील आदिवासी बांधव. यातील बहुतेकांसाठी तर चित्रपटगृहात येण्याचा पहिलाच प्रसंग. पण सर्वजण आले होते ते एकाच ओढीने…. आपल्या भाऊंची म्हणजेच डॉ. प्रकाश यांची जीवनगाथा बघण्यासाठी. एस्सेल व्हिजन प्रोडक्शनने पुढाकार घेत नागपूरमध्ये या विशेष शोज् चे आयोजन केले होते. याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. प्रकाश म्हणाले की, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप विशेष आहे. आज प्रत्येक क्षणाला मला आई-बाबांची आठवण येत आहे. आज ते असते तर हा चित्रपट बघून त्यांना खूप आनंद झाला असता. माझ्यावर चित्रपट करणं हे खरं तर खूप धाडसाचं काम होतं. कारण त्यात मनोरंजन, नाच गाणी यांना अजिबात स्थान नव्हतं. पण समृद्धी पोरे यांनी हे आव्हान पेललं. नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी उत्तम अभिनय करत आमचं जगणं योग्य प्रकारे पोचवलंय याचा आनंद आहे.” डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या की, “जिवंतपणी आपल्यावर सिनेमा तयार होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. आपला प्रवास मोठ्या स्क्रीनवर येतोय याचा विशेष आनंद आहे.”
यावेळी चित्रपटाच्या निर्माती-दिग्दर्शिका समृद्धी पोरे, सहनिर्माती उज्ज्वला हावरे, एस्सेल व्हिजनचे बिझनेस हेड निखिल साने उपस्थित होते. याशिवाय पूजा पिंपळकर, प्रसाद ढाकूलकर, योगेश राऊत, विनोद राऊत, मुग्धा देशकर हे चित्रपटातील स्थानिक कलावंतही उपस्थित होते.