पुणे : प्रत्येक महिलेने कौशल्य प्रशिक्षणाची कास धरल्यास त्यांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी जीवन जगता येईल असे मत येरवडा महिला मध्यवर्ती कारागृहाच्या महिला तुरुंग अधिकारी स्वाती पवार यांनी व्यक्त केले. येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शुक्रवारी दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजी येरवडा कारागृहात महिला बंदीच्या पुनर्वसनासाठी सुरु करण्यात आलेल्या ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्स चे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना बंदी कल्याण व पुनर्वसन प्रकल्प संचालिका वर्षा कणिकदळे म्हणाल्या की, कारागृहातील शिक्षा संपल्यानंतर सामान्य नागरी जीवन जगताना पुरुषांच्या तुलनेत महिलांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो.बऱ्याचदा त्यांच्या कुटुंबीयांकडूनही त्यांना सहकार्य मिळत नाही अशा अवस्थेत त्यांना स्वतःलाच स्वतःचा आधार बनण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची मोलाची मदत होऊ शकते, या विचारानेच महाराष्ट्र कारागृह विभागाच्या बंदी कल्याण आणि पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या सहकार्याने महिला बंदीसाठी शिवणकाम क्षेत्रातील ऍडव्हान्स फॅशन डिझायनिंग कोर्स सुरु करण्यात आला आहे.
एकीकडे शहरी जीवनमान वेगाने उंचावत असल्याने मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय समाजातील युवती व महिलांमध्ये वेषभूषेच्या नवनवीन संकल्पना रुजू लागल्या आहेत. सातत्याने नवीन प्रकार पेहरावाच्या बाबतीत पुढे येत आहेत. यामुळेच फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण करणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे महिला बंदींना जर हे प्रशिक्षण दिले तर पुढे जाऊन त्या अगदी सहजपणे समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन आपले नागरी जीवन सन्मानाने जगू शकतात. हा विचार केंद्रस्थानी ठेऊन सदर प्रशिक्षण देण्याचे निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला बंदींमध्येही या प्रशिक्षणाबाबतीत उत्साह दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
तर यावेळी बोलताना यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ म्हणाल्या की, हे प्रशिक्षण देण्याची संधी आम्हाला मिळत असल्याने आम्हालाही एक समाधान मिळत असून या प्रशिक्षणादरम्यान स्वयंरोजगाराचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे.