पुणे - स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने तृतीय वर्ष स्थापत्य अभियांत्रिकीच्या २०१९ पॅटर्नच्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी या विषयावर तीन दिवशीय ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यास मंडळाच्या सर्व सन्माननीय सदस्यांच्या उपस्थितीत झाले. या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ. एस.एन.लोंढे चेअरमन, स्थापत्य अभियांत्रिकी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी मागील अनेक वर्षांपासून उद्योग आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था यांच्यातील अपुऱ्या समन्वयामुळे उद्योग जगताला व सरकारी, निमसरकारी आस्थापनांना अभिप्रेत असणारे कुशल मनुष्यबळ मिळत नाही. हा दुरावा दुर करण्यासाठी व मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित अभ्यासक्रम तयार करून तो विध्यार्थ्यांना शिकविण्यात यावा. विध्यार्थ्यांना भविष्यात नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळण्यासाठी तसेच व्यावसायाभिमुख होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान युक्त अभ्यासक्रम शिकविणे व काळानुरूप तो अद्ययावत करणे हा या कार्यशाळेचा मुख्य गाभा होता. उद्योग जगताच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांमध्ये विशेष कौशल्ये विकसीत केली जात आहेत. याचप्रमाणे रोजगार क्षमता वाढीसाठी आणि उद्योजक होण्यासाठी विशेष प्रशिक्षण विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांच्यातील गुणांची व कौशल्यांची गरज, आधुनिक तंत्रज्ञान व आवश्यक मुल्यांची रूजवण करण्याची क्षमता याची २०१९ पॅटर्नच्या अभ्यासक्रमात तरतूद केलेली आहे. सदर कार्यशाळेत स्थापत्य अभियांत्रिकीच्या १४ विविध विषयावर चर्चासत्र घेण्यात आली. या कार्यशाळेसाठी विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील २०० प्राध्यापकांनी व स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यास मंडळाच्या सर्व सदस्यांनी आणि विविध महाविद्यालयाच्या विभाग प्रमुखांनी सहभाग नोंदविला.
सदर कार्यशाळेच्या सांगता समारंभास स्थापत्य अभियांत्रिकीच्या अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. श्रीनिवास लोंढे, डॉ.सुनिल कुटे, डॉ.सुनिल पिंपळीकर, डॉ.मधुकर वाकचौरे, डॉ.प्रविण नेमाडे, डॉ.अमोल पोटे, डॉ. सुहासिनी मढेकर, डॉ. मच्छिंद्र पुरकर, डॉ. उत्तम आवारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे, प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यशाळेचे नियोजन व आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. सागर गावंडे यांनी केले.