पुणे- गजानन कीर्तिकरांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी बाइक रॅली काढण्याच्या तयारीत असलेले काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना वर्सोवा पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.पोलिस सकाळीच माझ्या घरी घुसले. त्यांच्याकडे कसलेही अटक वॉरंट नव्हते. उद्धटपणा करत त्यांनी मला आंदोलन करणार असल्यामुळे पोलिस ठाण्यात आणले, असा आरोप निरुपम यांनी केला आहे.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी केलेला पक्षप्रवेश उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारांचा अपमान आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज बुधवारी दुपारी तीन वाजता बाइक रॅली काढण्यात येणार होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी संजय निरुपम अटक करून, त्यांना वर्सोवा पोलिस ठाण्यात नेले व रॅली काढण्यास अटकाव केला.
पोलिसांच्या दडपशाहीविरोधात निरुपम म्हणाले की, अतिशय, निष्क्रिय निरुपयोगी खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच शिंदे गट जॉइन केला. कीर्तिकर तुम्ही निष्क्रिय, निरुपयोगी आहात. त्यामुळे राजीनामा द्यावा, अशी मागणी करत आम्ही दुपारी तीन वाजता बाइक रॅली काढणार होतो. मात्र, शिंदे सरकारला आमची इतकी भीती वाटली की त्यांनी सकाळपासूनच मला घेरले.
निरुपम पुढे म्हणाले की, पोलिस अधिकारी कसलेही अरेस्ट वॉरंट नसताना जबरदस्तीने माझ्या घरात घुसले. मला वर्सोवा पोलिस ठाण्यात घेऊन आले . हे सरकार आमच्या राजकीय आंदोलनाने घाबरली आहे. एसीपी मानेंनी माझ्यासोबत जो उद्धटपणा केला. या प्रकरणी त्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली.