सुबोध भावेंना विनंती केली होती ; चित्रपट प्रदर्शनापूर्वी दाखवा पण … दाखविला नाही
अफजल खानाच्या समयी बाजी प्रभूंची उपस्थिती:शिरवळ येथील स्त्रियांचा बाजार -अशा प्रसंगांना आधार नाही
बाजीप्रभू आणि त्यांचे बंधू फुलाजीप्रभू यांनी बांदल देशमुखांच्या सैन्याचे नेतृत्व केले. दोन्ही भावांनी प्राणांची आहुती देऊन शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. मात्र, चित्रपटात दोन्ही भावांच्या लहानपणीच्या कटू प्रसंग दाखवून फुलाजी प्रभू यांची प्रतिमा मलीन करण्यात आली.
पुणे-सिनेमॅटिक लिबर्टी ही काल्पनिक गोष्टीमधे घेता येते, पण ऐतिहासिक घटनांमधे नाही. सिनेमॅटिक लिबर्टी याचा अर्थ इतिहास बदलणे असा होत नाही. ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणेही अनुचित आहे. ऐतिहासिक चित्रपट काढताना निर्माता, दिग्दर्शक, कलाकार तसेच इतिहास सल्लागार यांना खूप जबाबदारीने हे कार्य करावे लागते. दुर्दैवाने ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या बाबतीत अशा अनेक ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटना दाखविलेल्या आहेत, असे मत बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज अमर वामनराव देशपांडे, किरण अमर देशपांडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.पत्रकार परिषदेला रूपाली देशपांडे, महेश देशपांडे, सुभाष दिघे, सागर दिघे, राहुल दिघे, मोहनेश दिघे, मंदार कुलकर्णी, राजेंद्र देशपांडे उपस्थित होते.

अमर देशपांडे म्हणाले, हरहर ‘महादेव चित्रपटाच्या संदर्भात काही त्रुटीवर इतिहास अभ्यासकांनी देखील यातील काही प्रसंगांवर आक्षेप घेतलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज मुळातच हिरेपारखी होते. गुणग्राहकतेमुळे त्यांनी अनेक माणसे जोडली. शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना वरच्या घाटामध्ये जासलोलगड किंवा कासलोलगड हा किल्ला वसवण्याची जबाबदारी दिली होती व तसे पत्र उपलब्ध आहे. परंतु चित्रपटांमध्ये अनेक जागी देवळे बांधण्यात आली असा प्रसंग दाखवण्यात आला आहे.

पन्हाळा लढाई म्हणले की आपल्याला आठवते ते म्हणजे बांदल देशमुख, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचे नाव. बाजीप्रभू यांनी बांदल देशमुख यांचे सैन्याचे नेतृत्व यांनी केले होते. बांदल सैन्याने या युद्धात मोठा पराक्रम गाजवला आणि राजांचे प्राण वाचवले. बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्यामधील लहानपणीचा कटू प्रसंगांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही. या दोन्ही भावांनी स्वराज्यासाठी प्राणांची एकत्रित आहुती दिलेली आहे, अशा प्रसंगामुळे फुलाजी प्रभू यांची प्रतिमा मलिन होत असल्याचे ते म्हणाले.
चित्रपटांमध्ये शिरवळ येथील स्त्रियांचा जो बाजार दाखवलेला आहे. त्यासाठी सुद्धा,कोणता ऐतिहासिक संबंध घेतला होता, याचे दिग्दर्शक/निर्मात्यांनी यांनी स्पष्टीकरण द्यावे. बाजीप्रभूच्या मृत्यूनंतर बाबाजी प्रभू यांना बाजीप्रभू यांच्या पक्षात सरदारी दिली व इतर सात मुलांना पालखीचा मान व तैनाती करून दिल्या.बाजीप्रभू देशपांडे हे अत्यंत पराक्रमी योद्धा होते, परंतु चित्रपटांमध्ये अनेक वेळा ते भावनिक होताना दाखवलेले आहेत.
अफजलखानाच्या प्रसंगी बाजीप्रभू तेथे उपस्थित होते. याला काही ऐतिहासिक संदर्भ आहे का? सदर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट दाखवावा, अशी आम्ही कलाकार सुबोध भावे यांना विनंती केली होती. याबाबत निर्माते संपर्क साधतील असे सांगण्यातही आले होते. परंतु तसे झाले नाही प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट निदान इतिहास सल्लागारांना दाखवला होता का, हेसुद्धा महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.