पुणे, 29 एप्रिल 2022: बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड आणि कासट सारीज रविवार पेठ पुरस्कृत यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या बाऊन्स टेनिस अकादमी -एमएसएलटीए एआयटीए 14वर्षांखालील सुपर सिरिज 2022 स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात कर्नाटकाच्या जीडी मेघना हिने, तर मुलांच्या गटात विश्वजीत सणस यांनी विजेतेपद पटकावले, तर, दुहेरीत मुलांच्या गटात शिवतेज शिरफ़ुले व शार्दूल खवळे यांना तर, मुलींच्या गटात सिया प्रसादे व देवांशी प्रभुदेसाई यांनी विजेतेपद संपादन केले.
सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुलींच्या गटात अंतिम फेरीत कर्नाटकाच्या दुसऱ्या मानांकित जीडी मेघना हिने साईइती वराडकरचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. मेघना ही बंगळुरू येथील युरो शाळेत आठवी इयत्तेत शिकत असून अमोघा स्पोर्ट्समध्ये प्रशिक्षक अमोघ शिवराम यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने याआधी बेंगळुरू येथे झालेल्या 18 वर्षांखालील चॅम्पियन सिरीज टेनिस स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते.
मुलांच्या गटात अंतिम लढतीत पुण्याच्या तिसऱ्या मानांकित विश्वजीत सणसने आपला शहर सहकारी दक्ष पाटीलचा 6-4, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. विश्वजीत हा डॉ.शामराव कलमाडी शाळेत नववी इयत्तेत शिकत असून आदित्य कॅफे टेनिस अकादमीत प्रशिक्षक आदित्य मडकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
दुहेरीत अंतिम फेरीत मुलांच्या गटात शिवतेज शिरफ़ुले याने शार्दूल खवळेच्या साथीत विश्वजीत सणस व छनामल यले यांचा 6-2, 7-6(5) असा पराभव करून विजेतेपद पटकावले. तर, मुलींच्या गटात सिया प्रसादे व देवांशी प्रभुदेसाई या जोडीने साईइती वराडकर व देवाश्री महाडेश्वर यांचा 6-2, 6-4 असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक व 50एआयटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण सनीज वर्ल्डचे संचालक सनी निम्हण आणि स्पर्धा संचालक केदार शहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयटीए सुपरवायझर सैकत रॉय आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: मुख्य ड्रॉ(अंतिम फेरी): मुली:जीडी मेघना(कर्नाटक)[2] वि.वि.साईइती वराडकर(महा)6-1, 6-1;
मुले: विश्वजीत सणस(महा)[3] वि.वि.दक्ष पाटील(महा)6-4, 6-4;
दुहेरी गट:मुले: अंतिम फेरी: शिवतेज शिरफ़ुले/शार्दूल खवळे[1] वि.वि.विश्वजीत सणस/छनामल यले[3]6-2, 7-6(5);
मुली: सिया प्रसादे/देवांशी प्रभुदेसाई वि.वि.साईइती वराडकर/देवाश्री महाडेश्वर 6-2, 6-4.