विश्वराज हॉस्पिटलचे शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : माईर्स एमआयटीतर्फे पुणे-सोलापूर महामार्गावर राजबाग, लोणी काळभोर येथे उभारण्यात आलेल्या सूपरस्पेशालिटी विश्वराज हॉस्पिटलचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते रविवार, दि. 3 एप्रिल 2016 रोजी दुपारी ४.00 वाजता होणार आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट असणार आहेत. या समारंभाला खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, अभिनेते व दिग्दर्शक रणधीर कपूर, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आमदार राजेश टोपे, आमदार बाबूराव पाचरणे, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड आदी मान्यवर सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पुणे ते सोलापूर या परिसरातील जनतेला अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, तसेच अद्ययावत वैद्यकीय निदान व सेवा पुरविण्यासाठी 300 बेड्सच्या विश्वराज हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली आहे. तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ, तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान याचा अंतर्भाव या हॉस्पिटलमध्ये आहे. या हॉस्पिटलमध्ये मेडिकल, सर्जिकल, हृदयरोग, अस्थिरोग, प्रसूती व शिशुचिकित्सा, लॅप्रोस्कोपी आणि एंडोस्कोपी, प्लास्टिक सर्जरी, नेत्ररोग, कान-नाक-घसा, कर्करोग यासह इतर सर्जरीची सुविधा उपलबध असणार आहे. यासह 45 बेड्सचा अतिदक्षता विभाग असून, मोठा जनरल वॉर्डही असणार आहे.
सुमारे तीन लाख स्क्वेअर फूट एवढ्या विस्तीर्ण जागेवर बांधण्यात आलेले 300 बेड्सचे विश्व राज हॉस्पिटल पूर्णपणे रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन उभारण्यात आले आहे. रुग्णांना समर्पित सेवा देण्यासाठी सर्व प्रकारच्या उपचारपद्धती आणि सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. प्राथमिक उपचारांसह निरनिराळ्या आधारभूत, पुनर्वसन सेवा, तसेच रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांकरिता मूल्यवर्धित सेवाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
अशी माहिती विश्वराज हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. आदिती राहुल कराड व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गौरव कुमार यांनी दिली.