पुणे–पुण्यातील सीरम इंस्टीट्युट ऑफ इंडिया व हैदराबाद स्थित भारत बायोटेकने आपल्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या किंमतीत निम्याहून अधिक कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सीरम ‘कोविशील्ड’, तर भारत बायोटेक ‘कोव्हॅक्सिन’ची निर्मिती करते. आतापर्यंत या दोन्ही लसींचा एक डोस अनुक्रमे 600 व 1200 रुपयांना मिळत होता. पण, आता या लसींसाठी अवघे 225 रुपये मोजावे लागतील.
केंद्राच्या निर्णयानंतर दर कपात
केंद्राने शुक्रवारी देशातील सर्वच प्रौढ नागरिकांना दक्षता डोस देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोविशील्डच्या किंमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पुनावाला यांनी शनिवारी एका ट्विटद्वारे केंद्र सरकारशी विस्तृत चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार, या लसीचा 600 रुपयांचा एक डोस आता अवघ्या 225 रुपयांना मिळेल.
दुसरीकडे, भारत बायोटेकनेही आपल्या कोव्हॅक्सिन लसीच्या बुस्टर डोसची किंमत 1200 हून 225 रुपये करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या अधिकारी सुचित्रा इल्ला यांनी एका ट्विटद्वारे याची माहिती दिली. त्यांनीही केंद्रासोबत सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
केंद्राच्या निर्णयानुसार, रविवारपासून देशातील 18 वर्षांवरील प्रौढ नागरिकांना खासगी इस्पितळांत कोरोना लसींचा तिसरा डोस (बुस्टर डोस) देण्यात येईल.
सरकार 18 वर्षांवरील नागरिकांना दक्षता डोस देण्याचा खर्च उचलणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे मोजावे लागतील. सरकारने खासगी लसीकरण केंद्रांसाठी कोविशील्डची किंमत 780 रुपये, कोव्हॅक्सिनची किंमत 1410 व स्पुटनिक-व्ही ची किंमत 1145 रुपये निश्चित केली आहे. पण, आता दर कपातीनंतर कोविशील्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी अवघ्या 225 रुपयांना मिळतील
भारतातील लसीकरणाची आकडेवारी
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील 15 वर्षांवरील जवळपास 96 टक्के नागरिकांनी लसीचा एक डोस घेतला आहे. तर 83 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेत. आरोग्य व आघाडीवर तैनात कर्मचारी तथा 60 वर्षांवरील नागरिकांना 2.4 कोटींहून अधिक बूस्टर डोस देण्यात आलेत. 12 ते 14 वर्ष वयोगटातील 45 टक्के नागरिकांनीही पहिला डोस घेतला आहे.
भारतात दक्षता डोसची गरज का भासली
दक्षता डोस कोरोना लसीचा तिसरा डोस आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात धूमाकूळ घातल्यानंतर भारतात या डोसची गरज निर्माण झाली. देशात गत 10 जानेवारीपासून हा डोस देण्याची अधिकृत सुरूवात झाली आहे.