मंगळूर, दिनांक 24 जून 2017 ः पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले महिंद्रा अॅडव्हेंचर मॉन्सुन चॅलेंज रॅलीमध्ये सहभागी झाला आहे. देशातील सर्वाधिक अंतराच्या टीएसडी रॅलीचे अंतर साडेसहाशे किलोमीटर आहे.
संजय सुमारे वर्षभराच्या खंडानंतर मायदेशातील रॅलीत भाग घेत आहे. टाईम-स्पीड-डीस्टन्स (टीएसडी) स्वरुपानुसार ही रॅली होते. मंगळूरला शनिवारी स्पर्धकांना निशाण दाखविण्यात आले. माजी एपीआरसी विजेता असल्यामुळे संजयला सर्वप्रथम निशाण दाखविण्यात आले. इरोडचा महंमद मुस्तफा त्याचा नॅव्हीगेटर आहे. मंगळूरहून सुरु झालेली रॅली शिमोगा-मुर्डेश्वरमार्गे गोव्यातील पणजीत समाप्त होईल. पश्चिम घाट परिसरातील हा रमणीय मार्ग आहे. संजय महिंद्रा एक्सयुव्ही चालवेल. त्याने सांगितले की, आशिया-पॅसिफीक रॅली मालिकेतील आशियाचा टप्पा ऑगस्टमध्ये सुरु होत आहे. त्यापूर्वी मला स्पर्धात्मक सरावाची गरज होती. वाजवीपेक्षा जास्त दिर्घ ब्रेक फायद्याचा नाही. त्यामुळे मी या रॅलीत भाग घेतला आहे.
संजय-मुस्तफा जोडीने दक्षिण भारतातील अनेक रॅलींसह राजस्थान-गुजरातमधून जाणाऱ्या डेझर्ट स्टॉर्ममध्ये भाग घेत यश मिळविले आहे. यंदा सातवी मॉन्सून चॅलेंज मालिका आहे. त्यात महिंद्राची 25 वाहने विविध गटांत भाग घेत आहेत. केवळ वेग नव्हे तर वेळ आणि अंतराच्या मोजणीतील अचूकता यात महत्त्वाची असते. त्यामुळे ड्रायव्हर-नॅव्हीगेटरची कसोटी लागते. रॅलीच्या मार्गात महामार्ग, दुसऱ्या श्रेणीचे रस्ते तसेच कच्चे रस्तेही असतात. शनिवारी मोतीमहल हॉटेलपासून रॅली सुरु झाली.
चॅलेंज (व्यावसायिक), हौशी, कॉर्पोरेट, महिला, जोडपी आणि प्रसार माध्यमे अशा गटांमध्ये रॅली आहे. या रॅलीस एफएमएससीआय या अधिकृत राष्ट्रीय शिखर संघटनेची मान्यता आहे. महिंद्रा अॅडव्हेंचर संघाने भारतीय मोटर स्पोर्ट क्लबच्या (आयएमएससी) साथीत रॅलीचा मार्ग आखला आहे.