मुंबई-वेदांतचा हा प्रकल्प गुजरातला गेल्याप्रकरणी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. शिंदे गटातील आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी चर्चा करताना त्यांना वेदांत प्रकल्पावरुन प्रश्न विचारण्यात आला. “आमच्या शिवसेना-भाजपा सरकारला दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ‘वेदांत समुहा’चे मालक अनिल अग्रवाल यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीत मी होतो. उपमुख्यमंत्री होते. कंपनीचे प्रमुख डारेक्टर होते. त्यांना देखील आम्ही विनंती केली होती. सरकार आपल्याला ज्या काही सवलती आहेत त्या निश्चित देईल असं त्यांना सांगण्यात आलेलं. तळेगावजवळ ११०० एकर जमीन आम्ही देऊ केली होती,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हा प्रकल्प राज्याबाहेर जाण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कारणीभूत असल्याचंही शिंदेंनी अप्रत्यक्षपणे सांगितलं. “त्यांना ३३ ते ३५ हजार कोटींच्या सवलती दिल्या होत्या. त्यामध्ये सगळ्याच गोष्टी होत्या सबसिडी वगैरे आम्ही ऑफर केल्या होत्या. मात्र गेले दोन वर्षं त्यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळायला हवा होता तो कमी पडला असावा. आमच्या नवीन सरकारने त्यांना पूर्णपणे सवलती देऊ केल्या होत्या,” असं म्हणत शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदांता ग्रुप फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. सेमी कंडक्टर निर्मितीच्या या प्रकल्पाचा सामंजस्य करार हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. याद्वारे 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि रोजगार निर्मितीला बळ मिळेल, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.