पुण्यात होणारा ,आणि येथे सुमारे लाखभर लोकांच्या रोजगाराची संधी निर्माण करणारा वेदांता ग्रुप फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा प्रकरणी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई ,आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केल्यावर त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही टीका केली आहे . हा प्रकल्प गुजरात मध्ये गेलाच कसा ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे . हा प्रकार गंभीर आहे. म्हणूनच ह्या विषयाची सखोल चौकशी व्हायलाच हवी. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांच्या प्राधान्यक्रमाचं राज्य होतं. अशा राज्यातून गुंतवणुकीचा उलटा प्रवास सुरु होणं हे चांगलं लक्षण नाही. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या विषयाकडे बघायला हवं. असेही ट्वीट राज ठाकरे यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदांता ग्रुप फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. सेमी कंडक्टर निर्मितीच्या या प्रकल्पाचा सामंजस्य करार हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. याद्वारे 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल आणि रोजगार निर्मितीला बळ मिळेल, असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.