मुंबई : ठाकरेंना मुंबईत आव्हान देण्यासाठी शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. दादरमध्ये नवे शिवसेना भवन उभारण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे. सदा सरवणकर म्हणाले मुंबईत ठाकरे गटाचे वर्चस्व आहे, असा एक आभास तयार करण्यात आला आहे. मुंबईतल्या जनतेचे, शिवसैनिकांची उद्धव ठाकरेंवर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना कोणतीही कामे झाली नाहीत. एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही. असा आरोप सदा सरवणकर यांनी केला आहे.
सदा सरवणकर म्हणाले की शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आम्ही नव्या शाखा उभारणार असून प्रत्येक विभागात नवे कार्यालय तयार करण्यात येणार आहे. शिंदेंच्या कामाची गती पाहता मुंबईत नव्या कार्यालयाची गरज आहे. यासाठी आता लवकरच स्वतंत्र शाखा उभारल्या जाणार असून शाखाप्रमुखांची घोषणा होईल. असेही सदा सरवणकर यांनी म्हटले आहे. तर या मुख्य कार्यालयांच्या आदेशावर इतर विभागीय कार्यालयातील कामे चालतील असेही त्यांनी सांगितले आहे.
शिवसेनेतले दोन तृतियांश आमदार खासदार फोडून ठाकरेंची शिवसेना खिळखिळी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी पुढील लक्ष्य ठरवलं आहे. ज्या शिवसेना भवनातून जवळपास गेली ५ दशकं पक्षाचा कारभार चालला, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले गेले, अनेकांना जिथल्या तिथे न्याय दिला गेला, अनेकांच्या राजकीय आयुष्याला याच शिवसेना भवनातून कलाटणी मिळाली, त्याच शिवसेना भवनावर एकनाथ शिंदे दावा सांगणार, अशी गेली काही दिवस चर्चा सुरु होती. पण आता मुंबईच्या मध्यवर्ती भागातील दादरमध्ये नवं शिवसेना भवन उभारण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. लवकरच यासंदर्भातील पुढील पावलं उचलली जातील, अशी माहिती आहे.