यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स तर्फे आयोजित ‘कौशल्य दीक्षांत समारंभ’ संपन्न
पुणे : दिनांक १७ सप्टेंबर २०२२ : कौशल्य प्रशिक्षणाकडे सकारात्मकतेने पाहण्याची आवश्यकता असून कौशल्य प्रशिक्षणाचा सामाजिक स्तर उंचावण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील होण्याची गरज आहे, असे मत भारतीय युवा शक्ती ट्रस्टच्या मेन्टॉर जुही बोस यांनी व्यक्त केले.
यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स तर्फे पुण्यातील शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कौशल्य दीक्षांत समारंभात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, एखाद्या डिप्लोमा किंवा पदवी धारकाला ज्याप्रमाणे समारंभपूर्वक प्रमाणपत्र प्रदान केले जाते. त्याचप्रमाणे अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना देखील समारंभपुर्वक प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी ‘कौशल्य दीक्षांत समारंभ’ आयोजित करणे ही केंद्र सरकारची संकल्पना खूपच प्रेरणादायी आहे असे मत जुही बोस यांनी व्यक्त केले.
अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उद्योगक्षेत्रात रोजगारसंधी प्राप्त झाल्यानंतरसुद्धा आपल्यातील शिकण्याची वृत्ती कायम जागी ठेवा. सातत्याने आपल्यातील दोषांचे निरसन करत सद्गुणांची वाढ करण्याकडे लक्ष देत राहायला हवे. आपल्याला जे आणि ज्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळालेली असेल त्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये आपण आणखी काय सुधारणा करू शकतो, यादृष्टीने विचार करीत एकमेकांना सहकार्य करण्याची, एकमेकांकडून शिकण्याची वृत्ती जोपासायला हवी असे मत जुही बोस यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे फिल्ड ऑफिसर सोहम धापटे यांनी उदयोजकता म्हणजे काय हे विविध उदाहरणांद्वारे समजावून सांगत बीवायएसटी कशाप्रकारे नवउद्योजकांना सहकार्य व मार्गदर्शन करते याविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचे संचालक राजेश नागरे यांनी कौशल्य दीक्षांत समारंभानिमित्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते अप्रेन्टिस योजनेंतर्गत विविध स्केटर स्किल कौन्सिलच्या अंतर्गत पुणे येथील विविध आस्थापनांमधील अप्रेन्टिस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाला यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या संचालिका स्मिता धुमाळ, ‘यशस्वी’ संस्थेचे संचालक संजय छत्रे, बीवायएसटी चे क्लस्टर हेड अभिषेक धर्माधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी ईशा फाटक, गणेश साळवे, अबिद शेख आदींनी विशेष सहकार्य केले.