पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत, भाजप त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करत आहे असा आरोप काँग्रेसच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसींची मतं मिळवण्यासाठी त्याचा हा मोठा प्रयत्न आहे, मात्र मोदी हे ओबीसी नाहीत, त्याचे लवकरच पुरावे देऊन असंही त्यांनी म्हटलंय. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.नरेंद्र मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत, आम्ही ते उघड करणार आहोत, असं मोठं वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने आडनावावरुन माहिती संग्रहित केली होती. मात्र आडनावावरुन जात समजत नाही. एकाच आडनावाचे लोक अनेक जातींमध्ये असू शकतात. त्यामुळेच मोदी हे ओबीसी नाहीत. त्यासंदर्भातील सगळे पुरावेदेखील आमच्याकडे आहेत. हे पुरावे लवकरच जनतेपुढे आणू, असंही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातपेक्षा आम्ही महाराष्ट्रात उद्योग पुढे नेऊ अशी घोषणा केली. परंतु सन 2014 ते 2019 दरम्यान त्यांनी अनेक गोष्टी गुजरातला पाठवल्या आहे. त्यांचे स्वतःचे ही पद कमी झाले असून त्यांना मुख्यमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले, याबाबत आम्हाला ही दुःख आहे. राज्याचे मुख्यमंत्री सध्या नाच गाण्यात असल्याने त्यांच्याबाबत मी काही बोलणार नाही, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. नाना पटोले म्हणाले की, “फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेणारे सगळे मोदी आणि शाहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील तरुण जनतेचं काहीही देणंघेणं नाही. मुख्यमंत्र्यांबाबत काही न बोललेलंच बरं. सध्याचे मुख्यमंत्री नाचगाण्यात व्यस्त आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असे अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यांनी काय काय गुजरातला नेलं याची यादी द्यावी. मात्र तेच फडणवीस महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेण्याच्या गोष्टी करतात. राधाकृष्ण विखे पाटील देखील स्वत: केलेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये गेले
पुढे ते म्हणाले की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात जातीनिहाय जनगणना झाली त्याचा अहवाल केंद्र सरकारने जाहीर करावे. भारत जोडो यात्रा राजकीय नसून तो देशाला एकत्रित बांधण्याची यात्रा आहे. तिरंगा देशात नेहमी फडकत राहिला पाहिजे अशी त्यांची भावना आहे. त्यामुळे यात्रेत सहभागी होण्याबाबत आमच्या सहकारी मित्रांना निमंत्रण गरज नाही.
जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ओबीसी संघटन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. बंठिया आयोगाने आडनाववरून राज्यात 38 टक्के ओबीसी असल्याचे सांगितले. पण हा डाटा चुकीचा आहे. राज्यात सुमारे 60 टक्के ओबीसी जनता असून जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे ती आमची मागणी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नसून भाजप त्यांचे चुकीचे मार्केटिंग करत आहे. केंद्राने ओबीसी जनगणना केली पाहिजे त्याचा फुटबॉल करू नये, असे मत देखील नाना पटोलंनी व्यक्त केला.
लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न
पुढे नाना पटोले म्हणाले की, नोटबंदी हा देशातला नव्हे तर जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे. नोटबंदी काळात भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक जिल्ह्यात जमिनी घेण्यात आल्या त्यावर कार्यालये बंधण्यात आलीत. भाजपची ही चिवडा पार्टी होती, त्यांच्याकडे जमिनीसाठी पैसे कुठून आलेत. नोटबंदीच्या माध्यमातून त्यांनी काळा पैसा जमा केला असून, त्या पैशांच्या माध्यमातून देशात राजकारण सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा धाक दाखवून लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सध्या भाजपकडून सुरू आहे.