महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागेचा १३८ वा वर्धापनदिन सोहळा
पुणेः शाळा कोणतीही असो शिक्षक चांगले असतील तर विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी योग्य दिशा मिळते आणि त्यातून उत्तम विद्यार्थी घडतात. तसेच आजूबाजूचे वातावरणही मुलांच्या संगोपनासाठी महत्वाचे असते. आज समाजात ज्या चुकीच्या पद्धतीने इतिहास मुलांसमोर मांडला जात आहे त्यासाठी सामाजिक, राजकीय पातळीवर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी हुजूरपागेच्या १३८ व्या वर्धापनदिनानिमित्त लक्ष्मी रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा रेखा पळशीकर, उपाध्यक्षा हिमानी गोखले, सचिव वरदेंद्र कट्टी, संस्थेच्या प्रमुख विश्वस्त उषा वाघ, सहसचिव शालिनी पाटील, सर्व नियामक मंडळ सदस्य, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींना पारितोषिक देण्यात आले. तसेच सर्व विभागांनी तयार केलेल्या नियतकालिकांमधून पहिल्या तीन क्रमांकांच्या नियतकालिकांना बक्षीसे दिली गेली. यावेळी पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थिनींनी कथाकथन सादर केले.
वरदेंद्र कट्टी म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी १३८ वर्षांपूर्वी स्त्री शिक्षणाचे उद्दिष्ट घेऊन ही संस्था सुरू करण्यात आली. अनेक अडचणींवर मात करत ही संस्था प्रगती करत राहिली. सुरूवातीला १८ विद्यार्थींनी पासून सुरू झालेल्या या संस्थेत आज १२ हजार विद्यार्थीनी शिकत आहेत. अशा संस्थेच्या संस्थापकांना मी आज नतमस्तक होऊन अभिवादन करतो. ही संस्था आज बदलांना आत्मसात करत काळाच्या सोबत चालत आहे, असे ही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीना शिंदे यांनी केले. वरदेंद्र कट्टी यांनी प्रास्ताविक व हिमानी गोखले यांनी आभार मानले.