श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे शासकीय सेवेतील महिला अधिका-यांचा सन्मानसोहळा
पुणे : श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरातील सकारात्मकतेमुळे सर्वांना उर्जा मिळते. श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी आणि श्री महाकाली अशी देवीची तिन्ही रुपे एकाच ठिकाणी आपल्याला पहायला मिळतात व दर्शन घेता येते. मंदिरामध्ये विविध ठिकाणचे, विविध वर्गातील भक्त येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी उपयुक्त अशा शासकीय योजनांची माहिती अशा उत्सवांमधून पोहोचवायला हवी, असे मत पुणे जिल्हा निवडणूक विभागाच्या उपसंचालक मृणालिनी सावंत यांनी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात प्रशासकीय सेवेतील महिला अधिका-यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त तृप्ती अग्रवाल, अॅड.प्रताप परदेशी, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा निवडणूक विभागाच्या उपसंचालक मृणालिनी सावंत, उपजिल्हाधिकारी वनासी लाभसेटवार, पुणे तहसीलदार राधिका हवळ – बारटक्के, हवेली तहसीलदार तृप्ती कोलते या प्रशासकीय सेवेतील महिला अधिका-यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह आणि महावस्त्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
विश्वस्त तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत महिलांचे प्रमाण वाढत आहे. शासकीय स्तरावर उच्चपदस्थ महिला असून त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा. शासकीय योजना पोहोचविण्याकरिता उत्सव हे उत्तम माध्यम असल्याचे या अधिका-यांनी म्हटले असून श्री महालक्ष्मी मंदिर अशा शासकीय योजना पोहोचविण्याकरिता शासनाला कायम सहकार्य करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले. विश्वस्त प्रविण चोरबेले यांनी आभार मानले.