मुंबई-INS विक्रांत प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात किरीट सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी पुर्ण झाली आहे. याप्रकरणी न्यायालय आता संध्याकाळी निर्णय देणार आहे.सुनावणीनंतर सराकरी वकिल प्रदीप घरत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी आरोपींनी INS विक्रांतसाठी गोळा केलेले पैसे पक्षाला दिले, असे सांगितले. तसेच, आम्ही केवळ साडे अकरा हजार रुपये जमा केले, असेही आरोपींनी सांगितल्याची माहिती सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी दिली. मात्र, अपहार 1 पैशांचा असो की 1 कोटींचा तो अपहारच आहे. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्रांना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केल्याचे प्रदीप घरत यांनी सांगितले.
अटकपूर्व जामीन मंजूर करण्यायोग्य नाही!
INS विक्रांत हे गंभीर प्रकरण आहे. लोकांच्या भावनांचा वापर करत सोमय्या पिता-पुत्रांनी लोकांकडून 58 कोटी गोळा केले. मात्र, तो निधी नंतर राजभवनानकडे सोपवलाच नाही, अशी माहिती राजभवनानेच दिल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. तसेच, किरीट सोमय्या यांनी पैसे गोळा केले. मात्र त्याची पावती कोणालाही दिली नाही. त्यामुळे या निधीचे काय केले, याचे उत्तर मिळणे आवश्यक असून सोमय्या पिता-पुत्रांचा जामीन मंजूर करण्यासारखा नाही, असा युक्तीवाद त्यांनी केला. तसेच, मुंबई पोलिसांनीही किरीट सोमय्या यांच्या याचिकेला विरोध केला आहे.
शिवसैनिकांनीही निधी गोळा केला, सोमय्यांच्या वकिलांचा दावा
सुनावणीदरम्यान किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी न्यायालयात युक्तीवाद करताना धक्कादायक दावा केला आहे. केवळ किरीट सोमय्याच नव्हे तर INS विक्रांत वाचवण्यासाठी शिवसैनिकांनीही निधी गोळा केला होता, असा दावा सोमय्यांच्या वकिलांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नेमके कोणती कागदपत्रे, पुरावे न्यायालयात सादर केली हे अद्याप समजू शकलेले नाही.
केवळ राजकीय हेतुने आरोप!
निवृत्त लष्करी अधिकारी बबन भोसले यांच्या तक्रारीवरुन ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्या पिता-पुत्रांविरोधात INS विक्रांत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आरोप केल्यानंतरच हा गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना आणि भाजपचे संबंध बिघडल्यामुळे केवळ राजकीय हेतुने किरीट सोमय्यांना अडकवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे किरीट सोमय्यांना अटकपूर्व जामीन मिळावा व अटकेपासून त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी सोमय्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी यापुर्वीच उत्तर दाखल करत याचिकेला विरोध केला आहे. तसेच, याप्रकरणात अधिक चौकशी करण्यासाठी सोमय्यांच्या कोठडीची मागणी केली आहे.
सोमय्या पिता-पुत्र आहेत कुठे?
दरम्यान, आजच्या सुनावणीसाठीही किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या कोर्टात हजर झालेले नाहीत. तसेच, मागील 2 दिवसांपासून ते माध्यमांसमोरही आलेले नाहीत. त्यामुळे सोमय्या पिता-पुत्र आहेत कुठे, असा प्रश्न आता विचारला जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी दोघेही अटकेच्या भीतीने फरार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच, या घोटाळ्याची व्यापती फार मोठी आहे. किरीट सोमय्या यांनी देशभरातून INS विक्रांतसाठी निधी गोळा केला होता. त्यामुळे भाजपनेच किरीट आणि निल सोमय्या लपवले तर नाही ना?, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.