आईच्या वेदना, खाल्लेल्या खस्ता जो जाणतो, तोच विद्यार्थी श्याम बनण्याचा प्रयत्न करतो : प्रा. प्रदीप कदम
प्रेरणा विद्यालयात श्यामची आई स्मृती शताब्दी निमित्त व्याख्यान
पिंपरी-
आईने मुलाला आदर्श बनावे म्हणून केलेली शिक्षा, घेतलेले परिश्रम, सोसलेल्या वेदना, खालेल्या खस्ता ज्या मुलाच्या काळजाला बोचतात आणि जाणीव करून देतात अशा आईची मुले श्याम बनन्याचा प्रयत्न करतात. तसेच असा कार्यक्रम घेणारी शाळाच आदर्श पिढी तयार करू शकते, असे प्रतिपादन व्याख्याते प्रा. प्रदिप कदम यांनी केले.
श्यामची आई स्मृती शताब्दी निमित्त प्रा. प्रदीप कदम यांचे “श्यामची आई.. प्रेरणा युवकांसाठी’ या विषयावर थेरगाव येथील प्रेरणा विद्यालयामध्ये व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रा. कदम बोलत होते. याप्रसंगी प्रेरणा संस्थेचे अध्यक्ष तुकाराम गुजर, पिंपरी- चिंचवड मनपाचे शिक्षण मंडळ माजी उपसभापती नाना शिवले, संचालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले.
प्रा. कदम पुढे म्हणाले, स्वर्गाहूून श्रेष्ठ असते ती आई. म्हणून आई कल्पतरू मानणारे साने गुरुजी श्यामची आई पुस्तक लिहू शकले. आईची भक्ती, प्रेम व कृतज्ञता व्यक्तीला मोठ्या उंचीवर नेतात, हा आधुनिक काळातला आदर्श म्हणजे श्याम आणि श्यामची आई. संस्कार आवर्जून केले तरच होतात. केवळ बघून, बोलून आणि ऐकून होत नाही. यात कृती महत्त्वाची असते. यासाठी पालकांची भूमिका कृतीयुक्त असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी संवेदनशील असणे आणि पालकांनी सौजन्यशील राहणे व परस्परपूरक भावना व सत्य जपत हा संस्कारदीप तेवत ठेवण्याच प्रयत्न झाला, तरच श्याम घडतील, असा आशावादही प्रा. कदम यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी, आई-वडील, शिक्षक आणि संस्कार असा मेळ घालत… हसत खेळत श्यामचा शारीरिक, मानसिक आणि आत्मिक विकास यशोदा नावाच्या संस्कार सरितेने कसा केला व श्याम अवघ्या महाराष्ट्राचे आदर्श कसा होऊ शकला. हे कथन करीत प्रा. प्रदीप कदम यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. विद्यार्थ्यांना प्रेरणा, प्रसन्नता, प्रचिती या बाबींचा अनोखा प्रत्यय यानिमित्ताने आला.