पुणे : ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ची पीजीडीएम अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी प्रीती तिवारी हिच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण ठरणारी घटना नुकतीच घडली. प्रीतीने नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये अलिकडेच झालेल्या ‘ओपन नॅशनल ज्यु जित्सु चॅम्पियनशिप २०१७’ स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. ही स्पर्धा २० राज्यांतील स्पर्धकांत अत्यंत चुरशीने झाली आणि प्रीतीने त्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. स्पर्धेतील सुवर्ण पदक आणि रौप्य पदक विजेत्यांना एशियन गेम्समध्ये थेट प्रवेश मिळत असल्याने माझी निवड जाकार्तामध्ये वर्ष २०१८ मध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी झाली आहे, अशी आनंदी प्रतिक्रिया प्रीतीने व्यक्त केली.
“ज्यु जित्सु हा मल्लविद्येशी साधर्म्य असलेला जपानी मार्शल आर्ट क्रीडाप्रकार आहे. मात्र ज्यु जित्सुमध्ये तंत्रांचे काटेकोर पालन करावे लागते,” असे प्रीतीने स्पष्ट केले. या विजेतेपद स्पर्धेआधीचे दहा दिवस प्रीतीने खडतर प्रशिक्षण घेऊन मुंबईतील व्यावसायिक मिक्स्ड मार्शल आर्ट्स लढवय्ये मायकेल परेरा यांच्याकडे ज्यु जित्सुची खास तंत्रे शिकून घेतली.
विजेतेपद स्पर्धेत भारतभरातून एकूण २५० मुली सहभागी झाल्याने प्रीतीला आठ फेऱ्यांत लढत द्यावी लागली. उल्लेखनीय बाब म्हणजे प्रीतीचे वजन केवळ ४९ किलो असल्याने व या गटात अन्य कुणी स्पर्धक मुलगी नसल्याने तिला ५५ किलो वजन गटातील मुलींशी सामना करावा लागला. अर्थात या बदलाने विचलित न होता प्रीतीने प्रबळ आत्मविश्वासाच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवली.
आपल्या यशाचे रहस्य ‘कठोर मेहनत, आरोग्यपूर्ण आहार व कोणतेही पूरक शक्तिवर्धक न घेणे,’ हे असल्याचे प्रीतीने नमूद केले. ती दररोज न चुकता साडेतीन तास व्यायाम करते, ज्याची सुरवात योगसाधनेने होते आणि नंतर किक-बॉक्सिंग, मोइथाई (हाडांच्या मदतीने किकबॉक्सिंगचा चिनी प्रकार) याचे धडे ती गिरवते. यामुळे प्रीतीची हाडे इतकी बळकट झाली आहेत, की तिचे वजन केवळ ४९ किलो असुनही ती ८० किलो वजनाच्या मुलांना लीलया उचलू शकते. प्रीतीने लहानपणापासून हाडापेराने मजबूत मुलांसमवेत लढत देऊन कुस्त्या जिंकल्या असल्याने मुलींशी सामना करणे तिला फारच सोपे ठरते.
प्रीती ही बालपणापासून तंदुरुस्तीप्रेमी, क्रीडापटू व कुस्तीगीर असून तिला हे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी पालक, कुटूंब व आता तिचे सूर्यदत्ता कॉलेज यांच्याकडून भरपूर पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे. आता सरकार व क्रीडा प्राधीकरणांकडून आर्थिक मदत मिळावी, अशी तिची अपेक्षा आहे.
प्रीतीच्या या कामगिरीबाबत आनंद व्यक्त करताना ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “ प्रीतीच्या यशामुळे आमच्या संस्थेला अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे. तिच्यापुढील आव्हान वाटते तेवढे सोपे नव्हते. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतोच, परंतु त्यांच्या सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकासावरही भर देत त्यांनी अन्य विशेष उपक्रमांत सहभागी व्हावे, याची काळजी घेतो. प्रीती तिवारी ही आमच्या अन्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा ठरेल. तिला एशियन गेम्ससाठी आमच्यातर्फे खूप शुभेच्छा. ती सूर्यदत्ता संस्थेला आणि भारताला अभिमानास्पद अशी कामगिरी करुन दाखवेल, अशा विश्वास आहे.”
प्रीतीनेही या प्रतिपादनाला दुजोरा दिला. ती म्हणाली, “ सूर्यदत्ता संस्थेत मी उपक्रमांच्या मालिकांमधून आणि वर्षभर चालणाऱ्या मूल्य वर्धनातून कठोर मेहनतीची क्षमता, तसेच संपूर्ण समर्पितता व कटिबद्धता याद्वारे आपली उद्दिष्ट्ये कशी साध्य करावीत, हे शिकले आहे. आमचे अधिष्ठाता प्रा. डॉ. संजय चोरडिया आणि सौ. सुषमा चोरडिया हे दोघेही आमच्यासाठी प्रेरणास्थान असून आम्हाला त्यांच्याकडून खूप प्रेरणा व सातत्याने प्रोत्साहन मिळते.”
