पुणे ः यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, शरद पवार, राम नाईक, रमाकांत खलप, अरिफ महंमद खान, प्रकाश जावडेकर अशा केंद्रीय राजकारणातील दिग्गांजांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करणार्या प्रल्हाद भागवत यांचा पाच दशकांचा ‘दिल्ली दरबार’ गप्पातून पुणेकरांसाठी खुला झाला.
निमित्त होते प्रल्हाद भागवत यांच्या अमृतमहोत्साचे आणि त्यानिमित्त पुणेकरांनी केलेल्या सत्काराचे! शुक्रवारी सायंकाळी हॉटेल तरवडे ‘क्लार्क इन’ येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. सतीश देसाई यांनी प्रल्हाद भागवत यांच्याशी गप्पातून संवाद साधला आणि 5 दशकातील दिग्गजांच्या आठवणींचा खजिनाच खुला झाला!
यावेळी पुणेकरांच्या वतीने डॉॅ. शां.ब. मुजूमदार, डॉ. राम ताकवले, डॉ. सतीश देसाई यांनी प्रल्हाद भागवत आणि सौ. लता भागवत यांचा पुणेरी पगडी, उपरणे, भेट वस्तू देवून सत्कार केला.
माजी केंद्रीयमंत्री वसंत साठे, यांचे बंधू सुधीर साठे, विठ्ठल मणियार, डॉ. शां. ब. मुजूमदार, माजी खासदार आबासाहेब कुलकर्णी यांच्या कुटुंबातील श्री. कुलकर्णी इत्यादी मान्यवरांनी छोटेखानी मनोगतातून प्रल्हाद भागवत यांच्या कारकीर्दीचे कौतुक केले.
मोहन धारिया यांच्या पुणे लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्याप्रमाणे मदत करणार्या प्रल्हाद भागवत यांची लगबग धारिया यांच्या मनात भरली आणि त्यांनी मंत्री झाल्यावर भागवत यांना दिल्लीत बोलावून घेतले! 19 मे हा दिवस होता आणि योगायोगाने प्रल्हाद भागवत यांचा वाढदिवस होता. 19 मे 1971 ते 19 मे 2017 या पाच दशकातील आठवणी या संवाद कार्यक्रमातून उलगडत गेल्या.
‘तुम्ही काम केलेल्या सर्व मंत्र्यांच्या समान गुण कोणता होता?’ या प्रश्नाने डॉ. सतीश देसाई यांनी गप्पांना सुरुवात केली. केंद्रातील हे सर्व मंत्री खूप अभ्यास करणारे, कष्ट करणारे होते, उत्तम वक्ते होते. अभ्यास असल्याशिवाय संसदेत उभेच राहता येत नाही.
‘मंत्र्यांच्या मूडवर तुमचाही दिवस चांगला-वाईट जाणार हे ठरायचे का?’ अशा गुगली प्रश्नावर भागवत म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, शरद पवार, राम नाईक, रमाकांत खलप, प्रकाश जावडेकर हे सर्व मंत्री परिपक्व होते. त्यांच्या घरातील मूड, कार्यकालीन वावर वेगळा असायचा, त्याचा परिणाम कामकाजावर होऊ द्यायचे नाहीत. एकटे अरीफ महंमद खान हे ‘अॅरोगंट’ म्हणता येईल, असे होते.
‘चहा पेक्षा किटली गरम’ असे मंत्र्यांच्या स्वीय सहायकाबाबत बोलले जाते, तुम्हाला आपण मंत्र्यांइतकेच महत्त्वाचे आहोत, असे कधी वाटले का? या प्रश्नावर भागवत म्हणाले, ‘चांगलं काम करायला परवानगीची गरज लागत नाही. त्यामुळे मंत्र्यांच्या परस्पर अनेक छोटे निर्णय घ्यावे लागतात. उदाहरणार्थ, कॅबिनेट मीटिंगचा निरोप आल्यावर मंत्री वसंत साठे यांचा वर्धा दौरा रद्द झाल्याचा निरोप जिल्हाधिकार्यांना मी दिला आणि नंतर साठे यांना सांगितले ते रागावले नाहीत. काही मंत्र्यांना पी. ए. शिवाय जमत नाही. शरद पवार यांच्यासारखे मंत्री मात्र दिवाळीला आपल्या स्वीय सहायकाला सुटी मिळेल याची काळजी घेतात. अरीफ महंमद यांनी एकेदिवशी विचारले, ‘या कॅबिनेट मीटिंगला जाणे खरंच आवश्यक आहे का?’ तेव्हा यशवंतराव चव्हाण, धारियांच्या तालमीत तयार झालेल्या भागवत यांनी सांगितले. ‘आपण तसे थेट पंतप्रधानांच्या
रॅक्स
दूरध्वनी क्रमांकावर कळवू शकता!’ आणि अरीफ महंमद खान यांच्या लक्षात चूक आली, ते कॅबिनेट मीटिंगला गेले.
‘मंत्र्यांच्या घरी पुस्तकाची कपाटे दिसतात’ ते खरंच वाचतात की अभ्यासू असल्याचा देखावा करतात? असा दुसरा गुगली प्रश्न डॉ. सतीश देसाई यांनी विचारला. भागवत म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण, मोहन धारिया, शरद पवार, वसंत साठे हे मंत्री कामकाजाव्यतिरिक्तचे वाचनही करीत. वसंत साठे कलाक्षेेत्रातील छंद जोपसत. राम नाईक मात्र पक्के संघ शिस्तीत फक्त काम करीत राहत.’.
रामाकांत खलप प्रथमच खासदार झाले, लगेच मंत्री झाले त्यामुळे खूप गोष्टी ते मला विचारून करीत. त्याचा फायदा त्यांना झाला. मागच्या मंत्र्यांची कामाची पद्धत, सवयी नवा मंत्री विचारतो का? असा प्रश्नही विचारला गेला. तेव्हा भागवत म्हणाले, ‘हे प्रश्न विचारले जातातच पण त्याचा संबंध कार्यपद्धतीशी असतो. सकारात्मक शिकण्याशी असतो.’
मंत्र्यांबद्दल लोक काय कुजबुजताहेत, टीका करताहेत, हे तुम्ही मंत्र्यांना सांगता का? या प्रश्नाला उत्तर देताना भागवत म्हणाले, ‘काही बाबतीत मी सांगितलेले आहे, पण तेव्हा मंत्री चेहर्यावर काही दाखवत नाहीत. पण सुधारणा करतात.’
धारिया-यशवंतराव- साठे अशा शिस्तीत काम केल्यावर त्या शिस्तीबाहेर जाणे आम्हाला पटत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट आवडली नाही, तरी आम्ही स्पष्ट सांगत गेलो!
शरद पवार हे खूप ‘मॅच्युअर’ आहेत. ‘धीस मॅन डझंट नीड अॅडव्हाईस् ही नीडस् ओन्ली असिस्टन्स्’
स्वीय सहायक म्हणून आम्ही लो प्रोफाईल काम केले तर पुढे जास्त काळ काम करता येते. आपल्याला जास्त कळते असे दाखवून चालत नाही.
एका रेल्वेमंत्र्यांचे पी.ए. खासदार झाले, मंत्री झाले, पण मला अॅक्टीव्ह पॉलिटिक्समध्ये जाणे हा स्वभाव नव्हता. घरून सल्ला मिळाला तरी मी राजकारणात गेलो नाही, असे भागवत यांनी सांगितले.
वसंत साठेंच्या घरची कोथिंबीर वडी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना फार आवडायची. कोथिंबीर वडीचा डबा साक्षात इंदिरा गांधी यांना देण्याचा संस्मरणीय प्रसंगही भागवत यांनी सांगितला.
प्रल्हाद भागवत यांचा मुलगा सैन्यात असताना हेलिकॉप्टर अपघातात गेला. तेव्हा दीडच वर्षे सेवा झाली होती. राम नाईक यांचे स्वीय सहायक म्हणून भागवत कार्यरत होते. त्यांनी पाहिले की, एकूण सहाजण मृत पावले आहेत आणि आपल्याला मुलाच्या पेन्शन, नुकसानभरपाईची आवश्यकता नसली, तरी इतरांची परिस्थिती नाजूक आहे. एकाची पत्नी गर्भवती आहे. अशावेळी नोकरशाही फक्त पेन्शन देण्यावर अडून होती. सानुग्रह अनुदान (एक्स ग्रॉशिया) नियमात बसत नव्हते. भागवत यांनी इतर कुटुंबियांसाठी ‘एक्स ग्रॅशिया’ द्यावा. अशी बाब राम नाईक यांच्या कानी घातली. त्यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तसे पत्र लिहिले आणि अशा शहीद सैनिकांच्या 15 वर्षांतील प्रलंबित सर्वच प्रकरणांवर वाजपेयी यांनी तातडीने निर्णय घेतला.
त्या तुलनेत कारगील हे राजकीय युद्ध होते. मीडियावरही दाखविले जात होते आणि शहिदांना दहापट रक्कम तातडीने दिली जात होती, असा अनुभवही सांगितला. नोकरशाहीचा प्रत्येक काळातील शहिदांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा वेगळा असतो आणि तो वाजपेयींनी कसा बदलला ते सांगितले.
पत्रकार आमच्याकडून कॅबिनेटच्या बातम्या काढून घ्यायचा प्रयत्न करीत असत. पण आम्ही डिप्लोमॅटिक उत्तरे देत असू. आता काळ बदलला असून, मंत्रीच पत्रकारांना कॅबिनेट मीटिंगचे पेपर दाखवतात!