पुणे- जेष्ठ संशोधक व इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांचे वक्तृत्व आणि लिखाणाची शैली हे अत्यंत
खुमासदार होती असे गौरोद्गार प्रसिध्द संशोधक व कादंबरीकार विश्वास पाटील यांनी काढले. एवढे जाडजूड
ग्रंथाचे लिखाण करणारे हात आता राहिलेले नाही असे सांगून पगडी यांनी लिहलेले साहित्य प्रत्येक शाळेत व
घराघरात पोहचले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठी साहित्य परिषद, तेलंगण राज्य, इसमिया बाजार, हैदराबादच्या वतीने ‘समग्र सेतुमाधवराव पगडी’ या
पं.सेतुमाधवराव पगडी यांच्या ५ मराठी खंडाच्या (६ ग्रंथ) दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन विश्वास पाटील यांच्या
हस्ते पत्रकार भवन येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. मराठी साहित्य परिषद, तेलंगण राज्यच्या अध्यक्षा डॉ.
विद्या देवधर, डॉ. जयंत कुलकर्णी, श्री सुरेश कुलकर्णी, या खंडांचे मुद्रक व कल्पना प्रेसचे आनंद लाटकर हे
यावेळी उपस्थित होते.
विश्वास पाटील म्हणाले, सेतुमाधवराव पगडी यांनी ६६ मराठी ग्रंथ व काही इंग्रजी ग्रंथांचे संकलन केले. सुमारे
२० ते २२ हजार पानांचा हा संग्रह म्हणजे आपल्यासाठी ती देणगी आहे. एवढे जाडजूड ग्रंथाचे लिखाण
करणारे हात आता राहिलेले नाही असे सांगून पाटील म्हणाले, त्यांची वक्तृत्व शैली व लिखाण खुमासदार
होतेच परंतु त्याला अभ्यासाची जोड होती. त्यामुळे पगडींचे हे ऋण आपल्याला मान्य केलेच पाहिजे. १८ व्या
शतकातला वेध त्यांनी २ ऱ्या व ३ ऱ्या खंडात घेतला आहे असे सांगून पाटील म्हणाले, इतिहासकार आणि
संशोधक म्हणून ते मोठे होतेच परंतु शत्रू सुद्धा किती मोठा होता याचे दर्शन त्यांच्या लिखणातून झाले आहे.
आपले महापुरुष महत्वाचे आहेतच परंतु शत्रूही किती मोठा होता याचे वर्णन त्यांच्या लिखाणातून वाचकांना
समजले. ‘बचेंगे तो और भी लिखेंगे’ या बाण्याने त्यांनी इतिहासाचे लिखाण केले, असे गौरोद्गारही त्यांनी
काढले.
जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, सेतु माधवराव पगडी यांच्या कन्या श्रीमती अनुराधा ढवळे यांनी आपल्या
मनोगतात सेतुमाधवराव पगडी यांच्या आठवणी सांगितल्या. श्री आनंद लाटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त
केले.
डॉ. विद्या देवधर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मराठी साहित्य परिषद, तेलंगण राज्य करीत
असलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयंत कुलकर्णी यांनी केले. आभार गोविंद
देशमुख यांनी मानले. सौ. अर्चना अचलेकर यांनी सरस्वती वंदना सदर केली.
ग्रंथनिर्मितीत सहकार्य करणाऱ्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या पाच खंडांची सवलत किंमत सहा
हजार रुपये होती. शाळा, महाविद्यालये व ग्रंथालये यांनी याचा लाभ घ्यावा, त्यासाठी ०९४४०३७३७७७ या
क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. विद्या देवधर यांनी यावेळी केले.