पराभव ही यशाची पहिली पायरी-गीत सेठी
पुणे, – यशापेक्षा पराभव माणसाला खुप काही शिकवून जात असतो. किंबहुना पराभव हीच यशाची महत्वाची आणि पहिली पायरी असते, असे प्रतिपादन भारताचे माजी पाच वेळचे बिलियर्डस् जगज्जेते गीत सेठी यांनी आज केले.
महर्षी कर्वे शिक्षण संस्था व डॉ.भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर(बीएनसीए)यांच्या तर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा दामिनी स्पोर्टस् 2018चे पारितोषिक वितरण भारताचे माजी पाच-वेळचे बिलियर्डस् जगज्जेते गीत सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओजीक्युचे मनिष साबडे, बीएनसीएचे मुख्याध्यापक डॉ.अनुराग कश्यप, प्रा. उमेश चव्हाण, आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू अश्लेषा बोडस, महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या क्रीडा समितीचे चेअरमन प्रा.अनिल माणकीकर , प्राचार्य डॉ.मंजू हुंडकेकर, प्रा.संजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित खेळाडू आणि संवाद साधताना ते बोलत होते.
गीत सेठी पुढे म्हणाले की, आज हा आपण कार्यक्रम विजेत्यांना बक्षिस देण्याकरिता आयोजित केला आहे. पण मी बोलणार आहे, ते न जिंकलेल्या खेळाडूंबद्दल, जे खेळाडू जिंकू शकले नाहीत आणि ज्यांना दुसरा तिसरा क्रमांकही मिळविता आला नाही. त्यांनी आपण का जिंकू शकलो नाही?याचा विचार करण्याची गरज आहे. आपण आपल्या सर्व क्षमतेचा वापर करून कामगिरी बजावल्यास का जिंकू शकणार नाही. मला असे वाटते की, आपणच प्रयत्न करण्यात कमी पडतो आणि म्हणून जिंकू शकत नाही.
सेठी पुढे म्हणाले की, सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीच उदाहरण मी याबाबतीत देईन. कारण या दोघांनी आपल्या कारकिर्दीत अपयशाचाही अनेकदा सामना केला आहे. परंतु त्यातून सावरून पुन्हा यश मिळविण्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि अखेर यशाचे शिखरही गाठले. मला वाटते की, आपल्यापैकी प्रत्येकाने हा आदर्श ठेवायला हवा, मग तुमच्यापासून यश किती दिवस दूर पळेल. त्यामुळे विजेत्यांचे अभिनंदन करताना न जिंकलेल्या खेळाडूंना भविष्यातील यशासाठी माझ्या शुभेच्छा.
बीएनसीएचे मुख्याध्यापक डॉ.अनुराग कश्यप म्हणाले की, आपल्या नियमित स्पोर्टस् अॅक्टिव्हिटीमध्ये स्नुकर व बिलियर्डस्चा समावेश करावा असे मला वाटते. कारण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकंदरीत एकाग्रतेत सुधारणा होईल. तसेच त्यांचा संयम वाढेल आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वातही चांगली प्रगती होईल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवरांचे मी खास आभार मानतो.
महर्षी कर्वे शिक्षण संस्थेच्या क्रीडा समितीचे चेअरमन प्रा. अनिल माणकीकर म्हणाले की, 1938मध्ये अण्णांच्या 80व्या वाढदिवशी पुणे शहरांतील तत्कालीन संस्थांमध्ये मुलींसाठी स्पोर्टस् मीट घेण्याचे ठरविण्यात आले. त्यामध्ये काही सुधारणा व्हाव्यात असे मला वाटते आणि 2006-07मध्ये पहिला दामिनी स्पोर्टस् उपक्रम सुरू केला. पुण्याबाहेरील संस्थेच्या विविध शाखांमधील विद्यार्थी एकत्र येतील आणि त्यांच्यात वैचारिक देवाणघेवाण होईल, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. यावर्षी सातारा, वाई, नागपूर, रत्नागिरी इत्यांदी ठिकाणांहून 128विद्यार्थीनींनी आपला सहभाग नोंदविला आहे.
आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा दामिनी स्पोर्टस् 2018मध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, खो-खो, बुध्दिबळ, बास्केटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, लांबउडी, 100मीटर धावणे, 4X100मीटर रिले, स्लोसायकल चालविणे, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, क्रॉस कंट्री, रस्सीखेच, योगासने, सुर्य नमस्कार या खेळांचा समावेश होता. कबड्डी स्पर्धेत श्री सिध्दिविनायक महिला महाविद्यालय(एसएसव्हीएमएम)संघा ने विजेतेपद पटकावले. बुध्दिबळमध्ये पुण्याच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन संघाने प्रथम क्रमांक पटकावला. खो-खो स्पर्धेत श्री सिध्दिविनायक महिला महाविद्यालय(एसएसव्हीएमएम)संघा ने अव्वल क्रमांक पटकावला. टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर वुमेन संघाने विजेतेपद संपादन केले.