‘स्त्री चा संघर्ष जन्माआधी आणि नंतरही’ : फौजिया खान
पुणे :
‘जन्मानंतरच स्त्रीला संघर्ष करावा लागतो असे नाही, तर जन्म घेण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे. हा संघर्ष अजूनही संपलेला नाही; पण येणार्या आव्हानांना सामोरे जात स्त्रियांनी स्वत:त परिवर्तन घडवायला हवे’, असे मत माजी मंत्री फौजिया खान यांनी व्यक्त केले.
स्फुर्ती महिला मंडळ आणि ‘स्माईल’ संस्थेच्या ‘चेंजमेकर्स’ (परिवर्तनाचे दूत) या उपक्रमांतील स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी त्या प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.अॅड.वंदना चव्हाण होत्या. यावेळी नागर वस्तीविकास योजना विभागाचे उपायुक्त गणेश सोनूने, ईश्वर परमार, संजय कुंबरे, शिक्षण मंडळ अधिकारी वासंती काकडे, दर्शना परमार, माजी महापौर वैशाली बनकर, चंचला कोद्रे, शशिकला कुंभार, रवी चौधरी, मनाली भिलारे, नितीन जाधव, संजिवनी जोगळेकर, नीला विद्वांस, नेहा दांडेकर, श्रीराम टेकाळे, पदाधिकारी आणि नगरसेवक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृषाली दाभोळकर यांनी केले.
‘चेंज मेकर्स’ उपक्रमात प्रथम क्रमांक पद्मा कांबळे ग्रुप, द्वितीय क्रमांक शीतल कुंभार ग्रुप, तृतीय क्रमांक सुजाता पापरीकर ग्रुप यांना पारितोषिके देण्यात आली. पारितोषिकाचे स्वरूप रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक असे होते. ‘अष्टविनायक मित्र मंडळ’, ‘एसआरपीएफ ग्रुप’, ‘जयश्री घाडगे आणि ग्रुप’, ‘लक्ष्मी कोंडा आणि ग्रुप’ यांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले. अनिता थिटे, शर्मिला शिंदे, रत्ना नाईक, मृणालिनी वाणी यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
फौजिया खान म्हणाल्या, ‘महिलाविकासाची कामे झाली तर समाजात मोठा बदल होऊ शकतो आणि हा बदल अत्यावश्यक आहे. जे सकारात्मक बदल घडवून आणतात, त्यांचे निर्णय महत्त्वाचे असतात. महिलांनीही बदलाच्या दिशेने पावले टाकावीत. उच्च व अत्याधुनिक शिक्षण द्यावे.’
खा. वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘महिलांनी संगणकाचे शिक्षण घ्यावे. तंत्रज्ञानात कुठेही कमी पडू नये. व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा. आपण सक्षम झालो तरच घर आणि समाज सक्षम होईल.’
‘स्वत:मध्ये आणि आपल्या सभोवतालामध्ये बदल, परिवर्तन घडवून आणण्याची महिलांची, नागरिकांची शक्ती लक्षात घेऊन त्यातून स्थानिक पातळीवर व्यापक बदल घडविण्यासाठी ‘चेंजमेकर्स’ या ‘लोकल एरिया मॅनेजमेंट’ चा उपक्रम पुण्यात सुरू केला. दुसर्या वर्षीच्या या स्पर्धेमध्ये 180 संघ सहभागी झाले होते. चेंजमेकर्स गटांनी विडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक, सामूहिक विवाह, आरोग्य विषयक जनजागृती, क्रीडा विषयी ग्रंथालय, पोलिसांच्या कुटुंबियांसाठी रोजगार प्रशिक्षण, प्लास्टिक निर्मूूूलन, रक्तदान शिबीर, महीला सक्षमीकरण, आरोग्य कोठी, महिलांमध्ये कर्करोग जनजागृती, स्वच्छता अभियान, बेटी बचाव जनजागृती, महिलांसाठी भाजी मंडई आदी उपक्रम सहभागी गटांनी यशस्वी केले.’ असे देखील त्यांनी सांगितले.
स्पुर्ती महिला मंडळाच्या वतीने ‘स्फुर्ती पुरस्कार’ यावर्षी पासून जाहीर करण्यात आला असून, यावर्षीचा पुरस्कार शशिकला कुंभार यांना प्रदान करण्यात आला. श्रीराम टेकाळे, मनाली भिलारे, रवी चौधरी यांचा देखील विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फॅशन शो, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, बॅले डान्स या कार्यक्रमांचा सहभाग होता. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोनिका करंदीकर यांनी केले. फॅशन शो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रसिका चौंधे, द्वितीय क्रमांक गौरी जाधव आणि तृतीय क्रमांक रजनी शिंदे यांना पारितोषिक मिळाले.