पुणे: मराठ्यांचा व पुण्याचा इतिहास अतिशय रोमहर्षक आहे. पुण्यावर प्रेम करणार्या प्रत्येकानेच या ऐतिहासिक वारसा असणार्या या शहराचा अभ्यास, माहिती व स्वत:तले पुणेरीपण फडकत ठेवले पाहिजे. तीच प्रेरणा घेऊन मी शनिवारवाड्याची पार्श्वभूमी रंगवत रमा-माधव ही प्रेमकथा सांगणारा इतिहासपट तयार केला, असे स्वामी या गाजलेल्या मालिकेतील रमा व प्रसिद्ध अभिनेत्री व दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी यांनी सांगितले. निमित्त होते ते पेपरलिफ संस्थेने काढलेल्या स्मरणरम्य पुणे २०१७ या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाचे.
स्मरणरम्य पुणे व पुणे नोस्टाल्जिया अशा दोन्ही भाषेत असणार्या या दिनदर्शिकेत पत्रकार विवेक सबनीस यांच्या संग्रहातील जुन्या पुण्याची बारा दुर्मिळ छायाचित्रे आहेत. या दिनदर्शिकेत सबनीस यांनी जमा केलेला पुण्यासंबंधी इतिहास, आठवणी, किस्से व विनोद समाविष्ट केले आहेत. या दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्यात पेपरलिफ पुणे या संस्थेचे जतन भाटवडेकर, जुन्या पुण्याचे अभ्यासक मंदार लवाटे तसेच विजय सबनीस उपस्थित होते. कुलकर्णी यांच्या हस्ते स्मरणरम्य पुणे या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले.
कुलकर्णी म्हणाल्या की माझे साहित्यिक व गडप्रेमी आजोबा कै. गो. नी. दांडेकर यांनी महाराष्ट्रातील विविध कि“्यांची काढलेली छायाचित्रे प्रकाशित करताना माझ्या आईला जो आनंद झाला तसाच आनंद स्मरणरम्य पुणे दिनदर्शिका पाहाताना मला होत आहे! मुळात पुणे व मराठ्यांचा इतिहास इतका अप्रतिम आहे की त्यावर जास्तीत कलाकृती होणे गरजेचे आहे.
स्मरणरम्य पुणे मधील तसेच कृष्णधवल पुणे या आगामी पुस्तकातील छायाचित्रांची माहिती लवाटे यांनी सांगितली. ही सर्व छायाचित्रे लोकांपर्यंत नेणार्या जतन भाटवडेकरांचे मंदार लवाटे यांनी कौतुक केले. पुण्याचा वारसा व गेल्या शंभर वर्षांतील बदल दाखवणारी ही सारीच छायाचित्रे घराघरात पोचली पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सबनीस यांनी स्मरणरम्य पुण दिनदर्शिका काढण्यामागची भूमिका मांडताना एक पत्रकार म्हणून जुन्या पुण्याची छायाचित्रे जमवण्याच्या छंदाची माहिती सांगितली. ते म्हणाले की, पुण्यातील वास्तू त्यांची छायाचित्रे टिपताना असलेली छायाप्रकाश योजना त्यातील माणसांची देहबोली व हावभाव हे सर्वच मोह घालणारे आहेत.
मर्चंट नेव्हीमुळे जगभर प्रवास करताना प्रत्येक शहरातील जाणवणारा जाज्वल्य अभिमान पुण्यासाठीही दाखवण्याची संधी या दिनदर्शिकेमुळे मिळाली. तसेच पुण्यावरील दिनदर्शिकेचे हे तिसरे वर्ष असल्याचे भाटवडेकर यांनी सांगितले.
राजेश दामले यांनी या कार्यक‘माचे सूत्रसंचालन केले, तर सोहम भाटवडेकर यांनी आभार मानले.