पुणे-दोन सैन्यांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आता युद्ध होत नाही. युद्धाची रुपरेषा बदलली आहे. व्यवसाय, उद्योग, समग्र बाजारमूल्य, महसूल, संचालक मंडळाचे नियंत्रण असे त्याचे स्वरूप झाले असून, अहंकार हे युद्धाचे मूळ कारण आहे. या युद्धात यशस्वी नेतृत्वासाठी भगवद्गीता मार्गदर्शक असल्याचे मत, इस्कॉनच्या नियामक मंडळाचे सदस्य आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते गौरांग प्रभू यांनी व्यक्त केले.
‘भगवद्गीता आणि आदर्श नेतृत्व’ या विषयावर शहरातील विविध संस्थांनी एकत्र येऊन प्रभू यांचे स. प. महाविद्यालयात व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी प्रभू मार्गदर्शन करीत होते.
समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे, भक्तिवेदांतचे जनार्दन चितोडे, इस्कॉनचे संजय भोसले, विवेक व्यासपीठचे महेश पोहनेरकर, स्वामीनारायणचे राधेश्याम अग्रवाल, लक्ष्मीनारायण देवस्थानचे प्रल्हाद राठी आणि मुकुंद भवन ट्रस्टचे पुरुषोत्तम लोहिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रभू म्हणाले, ‘आदर्श नेतृत्व करण्यासाठी आंतरव्यक्ति कौशल्य, संवाद कौशल्य, प्रश्न व समस्या सोडविण्याची वृत्ती, संवेदनशीलता आणि चांगले मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याची क्षमता आवश्यक असल्याचे भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेतून युद्धभूमीवर युद्ध सुरु होण्यापूर्वी सांगितले आहे. त्याचा अर्थ समजावून घेऊन कृती करणे आवश्यक आहे. यासाठी भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार महत्त्वाचा आहे.’
प्रभू पुढे म्हणाले, ‘ धेय्य, विचार व सवयींवर नियंत्रण, निकोप दृष्टिकोन, योग्य मूल्यांकन करण्याची क्षमता, आत्मविश्वास, सहनशीलता, अनपेक्षित परिस्थितीत काय करायचे याची जाण, सत्य, हितकारी व न दुखावणारी भाषा, प्रार्थनेची जीवनशैली आत्मसात करणे, कोणावरही वर्चस्व न गाजवता ज्ञान, प्रेरणा, प्रेम, दया आणि भावनांचे आदान प्रदान करण्याचे करण्याचे कौशल्य विकसित करणे आदी गुण यशस्वी नेतृत्वाने संपादन केले पाहिजे.’
समर्थ युवा फाउंडेशनचे राजेश पांडे यांनी प्रास्ताविक, भक्तिवेदांतचे जनार्दन चितोडे यांनी परिचय, इस्कॉनचे संजय भोसले यांनी सूत्रसंचालन आणि विवेक व्यासपीठचे महेश पोहनेरकर यांनी आभार प्रदर्शन केले.