पुणे, १८ सप्टेंबर ; कोथरूडच्या पहिल्या महिला फॅमिली डॉक्टर मंगलाताई पटवर्धन (वय ९१ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या कोथरूड परिसरातील पहिल्या एमबीबीएस डॉक्टर होत्या.
त्यांनी कोथरूड, कर्वेनगर, वडगाव, खडकवासला, मुळशी परिसरात सर्वसामान्य नागरिकांची १९५४ पासून अविरतपणे वैद्यकीय सेवा केली. प्राप्त परिस्थितीत रस्त्यांचा अभाव असताना प्रसंगी रात्री अपरात्री सायकल, घोडागाडीत प्रवास करून त्यांनी रुग्णसेवा केली.
वैद्यकीय व्यवसायाला उत्पन्नाचे साधन न करता त्यांनी आयुष्यभर एक व्रत म्हणून वैद्यकीय सेवा केली. कोथरूड परिसरात हजारो कुटुंबांच्या त्या फॅमिली डॉक्टर होत्या.
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व स्वातंत्र्य सैनिक किशाभाऊ पटवर्धन यांच्या त्या पत्नी होत्या. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन, डॉ. महिपाल पटवर्धन, डॉ. वासंती पटवर्धन, डॉ. अवंती पटवर्धन आणि नातवंडे असा परिवार त्यांच्या पश्चात आहे.