पुणे – शिवलीला फिल्म्स च्या वतीने ‘परोपकारी नेता’ हा छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटातील युवा कलाकार तंत्रज्ञ निर्माते दिग्दर्शक उपस्थित होते. ‘परोपकारी नेता’ या चित्रपटात करण जाधव, प्रसन्न जोगदेव, अर्जुन प्रधान हे नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत. शिवलीला फिल्मचे शिवम लोणारी यांनी चित्रपटाच्या निर्मिती बरोबरच दिग्दर्शन आणि लेखनाची बाजू सांभाळली आहे. लोणारी यांच्या बरोबर सुरज कदम तसेच चिंतन मोकाशी संवाद लेखन करत आहेत. चित्रपटाचे संगीत मानस माळी यांचे असून वेशभूषा कीर्ती जंगम यांची आहे. चित्रपटाचे कला दिग्दर्शन शंतनू कुलकर्णी करणार असून ग्राफिक्स व व्हीएफएक्सची विराज पंध्ये सांभाळणार आहेत. क्रिएटीव्हज श्रीपाद जाधव करणार आहेत. चित्रपटाचे छायांकन अथर्व वाघ करणार असून नीरज वळसंगकर आणि प्रतिक जोशी हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून वळसंगकर संकलनाची जबाबदारी पार पाडणार आहेत तसेच संकेत भंसाली आणि निखिल लिमये हे लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहेत.
छगन भुजबळ यांचा बालपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे निर्माते-दिग्दर्शक शिवम लोणारी यांनी सांगितले. ते म्हणाले, छगन भुजबळ एक राजकारणी म्हणून लोकांना परिचित आहेत परंतु या चित्रपटातून त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू, त्यांची जडणघडण, संघर्ष तसेच त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे व यासाठी सर्व भुजबळ कुटुंबियांचा पाठिंबा आणि सहकार्य आम्हाला मिळत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पुणे मुंबई आणि नाशिक याठिकाणी करणार असून चित्रपट नऊ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यास चा आमचा मानस असल्याचे लोणारी यांनी सांगितले.