मुंबई – पवारांच्या घरावरील हल्या प्रकरणी एक नवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. आता काही पत्रकारांचाही जबाब नोंदवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या वृत्तामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याप्रकरणात काही पत्रकारही पोलिसांच्या रडारवर असून पोलिस अधिकचा तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शुक्रवारी शरद पवार यांच्या मुंबईतील घरावर हल्ला झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडल्या आहेत. यानंतर अनेक चर्चांना उधाण आलं असून एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या हल्याप्रकरणी आता आणखीन काहीजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात दोन ते तीन एसटी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. याआधही ११० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आणखी काही लोकांना काल ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्यांना आज गिरगाव न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, आता या प्रकरणात पत्रकारांचा जबाबही नोंदवला जाणार असल्याने पत्रकारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पवार यांच्या घरावर हल्ला आणि आंदोलन होणार आहे हे आधीपासून काही पत्रकारांना माहिती होतं. त्यामुळे यामध्ये कोणत्या पत्रकारांचा समावेश होता याचा तपास सुरु आहे. याशिवया या पत्रकारांचा जबाबही नोंदवला जाणार असल्याने पत्रकारांच्या अडचणीत वाढ होणार आहे. पोलिसांकडून या पत्रकारांची चौकशी सुरु आहे. तसेच त्यादिवशीचे सीसीटिव्ही फुटेजही तपासले जात आहे. या सर्व तपासानंतरच या प्रकरणात पत्रकारांची नेमकी काय भूमिका होती हे समोर येणार आहे. त्यामुळे काही पत्रकारांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची माहिती मिळत आहे.