पुणे-ऍट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कायद्याच्या संरक्षणासाठी अभूतपूर्व जनसागर पुण्याच्या रस्त्यावर अवतरला . राज्यात महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ, शेतकरी वर्गाच्या आत्महत्या,अशा विविध मागण्यांसाठी डेक्कन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत संविधान सन्मान मूक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला जिल्हयाच्या विविध भागातून लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळी 8 वाजल्यापासूनच मोर्चासाठी नागरीक डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात दाखल झाले होते. हातात निळे, पिवळे झेंडे, बॅच, गळ्यात मफलर परिधान करत मोठ्या उत्साहात मोर्चेकरी सहभागी होताना दिसले. संविधान सन्मान मूक मोर्चाला आज दुपारी12 वाजण्याच्या सुमारास डेक्कन येथील संभाजी महाराजाच्या पुतळ्यास युवतीच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यानंतर मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर 3 वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहचला.यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर विधान भावनासमोरील बाजूस युवतींनी निवेदन वाचून भूमिका मांडली.