मुंबई-शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी समन्स बजावले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. मात्र आता ईडीच्या या समन्सवरुन शिवसेना आणि भाजपा पुन्हा आमने-सामने आल्याचे चित्र दिसत आहे. ईडीने रविवारी यासंदर्भातील नोटीस वर्षा राऊत यांना पाठवल्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला आहे. या बॅनर्सचे फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेत.शिवसैनिकांनी हा बॅनर लावल्याचे लक्षात आल्यानंतर काही पोलीस अधिकारी या ठिकाणी पोहचले. मात्र तुम्हाला हा बॅनर काढता येणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा असं शिवसैनिकांनी पोलिसांनी सांगितलं. यासंदर्भातील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी नंतर हा बॅनर खाली उतरवला.