नागपूर – येथील गांधीनगर भागातील भारतीय स्टेट बँकेच्या अंबाझरी शाखेतील एका कॅशियरचा बँकेत काम करत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कामाचा वाढलेला ताण व गर्दीचा दबाव यामुळे हा मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविला जातो आहे . पाचशे व हजाराच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर देशभरातील हा ३५ वा मृत्यू असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे.
रामपंतुला व्यंकटेश राजेश असे या मरण पावलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांचे वय ५० वर्षांचे होते. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास बँकेत काम करत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना लगेच नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले. आर. व्ही. राजेश मुळचे वाराणसीचे असून २०११ पासून ते भारतीय स्टेट बँकेच्या अंबाझरी शाखेत कस्टमर असिस्टंट म्हणून कामाला होते. आर व्ही. राजेश हे वायुसेनेतून निवृत्त कर्मचारी होते. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा पुण्यात एमबीएचे शिक्षण घेत असून दुसरा लहान मुलगा नागपुरात शिकत असल्याचे सांगण्यात आले.