पुणे : पारंपरिक वीज निर्मिती प्रक्रिया खर्चीक तर साठे मर्यादित आहेत. यामुळेच सौर ऊर्जेचा वापर करणे काळाची गरज आहे. सध्या उपलब्ध असणार्या सौर ऊर्जा उत्पादनापैकी, तांत्रिक दृष्ट्या सर्वोत्कृष्ट असणारे पॉवर ऑन डिमांडचे (पी.ओ.डी) इंटिग्रेटेड पथ दिवे अधिक चांगला पर्याय होवू शकतात असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. पीओडीच्या उत्पादनाचे महाराष्ट्रासाठीचे एकमेव वितरक सनलाभ एनर्जीच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन श्री बापट यांच्या हस्ते येथे झाले. उदघाटनानंतर ही उत्पादने बाजारात विक्रीसाठी आणण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार जयदेव गायकवाड, उद्योजक विनायक पंडित, सनलाभ एनर्जीचे संचालक सुनील माने, सौ. लक्ष्मीकांता माने, पी.ओ.डी. चे संचालक कंदर पांडे, सल्लागार हर्ष डुगर आदी उपस्थित होते.
श्री बापट म्हणाले, “पेट्रोल, डिझेल, कोळसा या सारख्या पारंपारिक ऊर्जा साधनांचा साठा आपल्या अमर्यादित वापरामुळे संपणार आहे. त्यामुळे ऊर्जा मिळवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करणे सर्वोत्तम पर्याय भविष्यात असणार आहे. हीच गरज ओळखून केंद्र व राज्य सरकारही सौर ऊर्जा उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत. या साठी केंद्राकडुन अनेक सवलती आणि अनुदान मिळत आहे. ऊर्जेची बचत करण्यासाठी सौर उर्जेवरील पथदिवे बसवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.”
सध्या उपलब्ध असणारे पथदिवे अवजड असल्याने वापरण्यास कठीण असतात, बसवल्यानंतर त्यांचा देखभालीचा खर्च जास्त आहे. सुटे भाग चोरीला जाण्याचे प्रकार घडतात. पी.ओ.डी दिव्या मध्ये बॅटरी, सोलार पॅनल, लाइट एकत्रच असल्याने या भागांशी छेडछाड होवू शकत नसल्याने या भागांची चोरी होण्याची भीती नसते. हे सर्व भाग एकत्र करून तयार केलेले दिवे (इंटिग्रेटेड सोलर लॅम्पस) ‘पी.ओ.डी’ या कंपनीने बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, आफ्रिका येथे मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हे पथदिवे आता महाराष्ट्रातही उपलब्ध झाले आहेत. भविष्यात या पथदिव्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
या पथ दिव्यांना आय पी 65,आरओएचस, मान्यता प्राप्त झाली आहे. यामध्ये वापरण्यात आलेल्या सेन्सॉरमुळे वाहतूक कमी असलेल्या वेळेस याचे दिवे कमी प्रकाश देतात तर जास्त वाहतुकीच्या वेळेस ते प्रखर होतात. हे पथदिवे स्वयंचलीत असल्याने अंधार पडल्यानंतर स्वत: सुरू होतात तर उजेडात ते बंद होतात. यामध्ये लेटेस्ट लिथियम बॅटरी वापरण्यात आल्याने ती कमी वेळेत चार्ज होते. हे उत्पादन प्रदूषण विरहीत व पर्यावरण पुरक आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं वायरिंग लागत नाही. 5 ते 80 वॅट मध्ये उपलब्ध असणारे हे पथ दिवे सुरू होतानाच पूर्ण क्षमतेने सुरू होतात. या सारख्या सोयी असणारे पी.ओ.डी हे एक परिपूर्ण पथदिवे आहेत.