पुणे- “अहिल्याबाई होळकरांचे नांव सोलापूर विद्यापीठास दिल्यास जातीय तेढ निर्माण होईल व विद्यापीठाच्या निकोप विकासाला अडथळा होईल” असे राज्याचे शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांनी विधानसभेत नामविस्ताराच्या प्रश्नाला उत्तर देतांना सांगितले. ज्या अहिल्याबाई होळकरांनी आपल्या राज्याच्या सीमा ओलांडुन संपुर्ण देशभर अवाढव्य लोकोपयोगी निर्माणकार्ये केली, ज्यांचा देशातच नव्हे तर जगभर गौरव केला जातो अशा प्रजाहितदक्ष अहिल्याबाईंच्या नांवामुळे जातीय तेढ निर्माण होईल असे विधान करुन त्यांचा घोर अपमान केला आहे. हे विधान श्री. तावडे यांनी तत्काळ माफी मागत मागे घेऊन सोलापूर विद्यापीठ व्यवस्थापन समितीवर कारवाई करावी अशी मागणी महाराजा यशवंतराव होळकर गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणी यांनी केली.
अहिल्याबाई होळकर जरी आदिवासी धनगर समाजात जन्माला आल्या असल्या तरी त्यांचे जीवन हे जाती-धर्मापार जाणारे होते. तत्कालीन मुस्लिम राजे-रजवाड्यांनीही धर्म मधे न आणता त्यांना आपल्या राज्यात मंदिरे, धर्मशाळा, घाट, बारवा आदि जनोपयोगी वास्तू उभारू दिल्या. भारताचा मानबिंदू असलेले सोमनाथही त्यांनी पुन्हा उभारले. त्यांच्याबद्दल आदर नाही असा कोणी संपुर्ण देशात सापडणार नाही. भारतातील सर्व महापुरुष व महानायिका दुर्दैवाने कोणत्या ना कोणत्या जातीत जन्माला आलेले असतात पण कर्तुत्वाने जातीपार जात त्यांनी हा देश घडवला आहे. अहिल्याबाईंचे नांव दिल्याने अहिल्याबाई मोठ्या होत नाहीत तर त्यातून आपली कृतज्ञता व्यक्त होते. इतरांचे नांव दिल्याने जातीय तेढ निर्माण होत नाही पण अहिल्याबाइंचे नांव दिल्याने मात्र होते असा जावईशोध व्यवस्थापन समितीने लावावा व श्री. तावडेंनी आपण इतिहासात कच्चे असून आपणच जातीयवादी व स्त्रीद्वेष्टे असल्याचे सिद्ध करीत विधानसभेत तीच री ओढत अहिल्याबाईंचा अपमान करावा या संतापजनक विधानाचा प्रतिष्ठान सर्व समाजांच्या वतीने तीव्र निषेध करीत आहे.
विद्यापीठाला अथवा अन्य कोणत्या वास्तुला कोणाचे नांव द्यावे की नाही हा अत्यंत वेगळा व चर्चेचा मुद्दा असून अहिल्याबाईंच्या नांवामुळे जातीय तेढ निर्माण होईल या विधानामुळे समस्त अहिल्याप्रेमी समाजांत संतापाची लाट उसळली आहे. श्री. तावडे यांनी तत्काळ हे विधान मागे घ्यावे, विधानसभेच्या पटलावरून ते विधान वगळावे व अहिल्याबाईंची माफी मागावी अशी मागणी प्रतिष्ठान करीत आहे असे सोनवणी म्हणाले.