पुणे-शहरातील रस्ते खचण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने पुण्यातील रस्त्यांचे सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी भाजपचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे .
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि ,आज सकाळी राजाराम पुलाजवळील डी पी रस्त्यावर (हॉटेल गिरीजा समोर,मॅजेंटा लॉन्स समोर) मुख्य रस्त्यावरील ड्रेनेज चेंबर खचल्याचा प्रकार घडला.या ठिकाणी पाण्याची मोठी पाईपलाईन,ड्रेनेज लाईन,एम एन जी एल गॅस लाईन अश्या विविध वाहिन्या असून येथील रस्ताच खचल्याचे प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले,येथे ५ फुटांचा मोठा खड्डा पडला असून सुदैवाने तेथून त्यावेळी वाहने जात नसल्याने अपघात टळला.मात्र शहरात अश्या घटना वारंवार घडत असल्याचे दिसून येते ,( पौड रस्ता,सातारा रस्ता,संचेती चौक अश्या विविध ठिकाणी )भुसभुशीत माती व विविध कारणांसाठी सातत्याने रस्ते खोदाई मुळे इन्फ्रास्टक्चर वर अतिरिक्त ताण पडत असल्याचे निदर्शनास येते.तसेच प्रचंड प्रमाणात वाढलेली वाहतूक,हवामानातील बदल,पावसाचे साठणारे पाणी या सर्वांचा संयुक्त परिणाम होत आहेच.त्यातून मी वारंवार मागणी करून ही खोदाई नंतर रस्ता पूर्ववत करण्याची मनपा ची यंत्रणा कुचकामी असून बहुतांश ठिकाणी रस्त्याची दुरावस्था दिसून येते.
तरी संभाव्य अपघात टाळण्यासाठी व नागरिकांचे हितरक्षण व सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने अशी स्थळे जेथे मोठ्या प्रमाणात पाईप लाईन वा तत्सम कामे झाली आहेत तेथे सेफ्टी ऑडिट करावे व आवश्यक ती उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी करत आहे.