पुणे-कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब असून मेट्रोच्या कामामुळे त्यात भर पडली आहे,मात्र माझ्या प्रभागात गरवारे कॉलेज ते कर्वे पुतळा येथील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी आपण प्रयत्नशील असून नागरिकांना त्रास होऊ देणार नाही असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सांगितले.ह्या रस्त्यावरील विविध समस्यांबाबत त्यांनी सर्व संबंधितांचा पाहणी दौरा आयोजित केला होता,यावेळी नगरसेविका माधुरीताई सहस्रबुद्धे,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,मनपा चे उपयुक्त माधव जगताप,सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक )प्रभाकर ढमाले,वाहतूक पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी,कॅनॉल रस्त्यावरील जागा मालक चित्रसेन खिलारे,योगीराज खिलारे,स्थानिक कार्यकर्ते संतोष मोहिते,संगीताताई आदवडे,राहुल चौधरी,नितीन नलावडे,मंगेश टाके,सचिन पवार,इ उपस्थित होते.
यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी विविध समस्यांची माहिती दिली व कारवाईची मागणी केली.विशेषतः गरवारे कॉलेज ते पौड फाटा येथील परिस्थिती गंभीर आहे,येथे कॅनॉल रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करणे,पी एम पी एल चे बस स्टॉप हलविणे,नो पार्किंग झोन करणे, यासह कॅनॉल रस्ता वाहतुकीसाठी सुलभ करणे अश्या अनेक उपाययोजना युद्धपातळीवर केल्या जाव्यात अशी मागणी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केली.
तब्बल अडीच तास चाललेल्या पाहणी दरम्यान खालील निर्णय घेण्यात आले –
१) एस एन डी टी समोरील कॅनॉल रस्त्यावरील सर्व अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करणे.
२) येथील गाई म्हशींच्या गोठ्यांना मुंढव्यातील पर्यायी जागेत स्थलांतरित करणे. ( ह्या सर्व कामात प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व सहकार्य देण्याचे वचन दिले )
३) करिष्मा चौकातील सर्व स्टॉल कॅनॉल रस्त्यावर स्थलांतरित करणे,( येथील सर्व स्टॉल धारक भारत निंबाळकर,सचिन अभंग,दत्ता कंधारे,बाबा आढाव,बोकील घड्याळवाले,मुकेश चिंचोरे,मुश्ताक खान यांनी पर्यायी जागेत जाण्यास मान्यता दिली ) नगरसेविका मंजुश्री खर्डेकर व माधुरी सहस्रबुद्धे यांनी येथे कट्टा बांधून त्यावर स्टॉल उभारणे,पाणी, लाईट व शौचालयाची व्यवस्था करण्याचे वचन दिले,
४ ) एस एन डी टी कॉलेज समोरील बस स्टॉप हलवून पौड फाटा फ्लाय ओव्हर शेजारी केदार एम्पायर जवळ बसविणे.(सदर विषयात संतोष मोहिते,राहुल चौधरी,नितीन नलावडे,मंगेश टाके,सचिन पवार ह्या स्थानिक रहिवाश्यांनी संपूर्ण सहकार्याचे वचन दिले.)
५ ) कर्वे रस्ता व करिष्मा सोसायटी समोरील रस्ता नो पार्किंग झोन करणे व कॅनॉल रस्त्यावर एकाच बाजूला (नेहरू वसाहतीच्या बाजूला ) पार्किंग ची सुविधा उपलब्ध करणे.
६) मेट्रोच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होणार नाही व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही यासाठी विविध उपाययोजना करत असल्याचे वाहतूक शाखेचे प्रभाकर ढमाले व प्रतिभा जोशी यांनी सांगितले,
७) स्टेट बँक समोरील गल्लीतील हातगाडीवाले व अन्य विक्रेते पर्यायी जागेत स्थलांतरित केले जातील ,यास सदर हातगाडीवाल्यांनी ही मान्यता दिली.
८ ) मेट्रो चे ट्राफिक मार्शल विठ्ठल चव्हाण यांनी वाहतूक सुरळीत राहण्यासाठी १५ वार्डन नेमणार असल्याचे सांगितले.
ह्या परिसरातील नागरिकांशी सुसंवाद साधला,त्यांना मेट्रोच्या कामाची माहिती दिली व त्यांच्या सहकार्यानेच वाहतूक कोंडी सुटेल व या परिसराचा विकास होईल असे सांगितल्यावर सर्वच नागरिकांनी सहकार्य करण्याचे वचन दिले याबद्दल मी समाधानी असल्याचे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.हे वेगळेपण आणि समंजसपणा दाखवणाऱ्या नागरिकांच्या प्रति ऋण व्यक्त करतानाच आता प्रशासनाने कार्यतत्परता दाखवावी आणि आज ठरलेले सर्व विषय त्वरित मार्गी लावावेत अशी अपेक्षा भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर व नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली.
ही सर्व कामे युद्धपातळीवर येत्या ८ दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन माधव जगताप व त्यांचे सहकारी श्री खुडे,श्री नरुले,श्री दीपक ढेलवान व इतरांनी दिले.