पुणे : नवनियुक्त पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी पुणे पोलिस आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. मावळते पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रितेश कुमार यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले. राज्य सरकारच्या गृह विभागातर्फे 13 डिसेंबर रोजी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये मागील काही दिवसांपासून पुण्याच्या पोलिस आयुक्त पदी कोण विराजमान होणार, यावरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. अखेर राज्य सरकारने रितेश कुमार यांची नियुक्ती केल्यानंतर चर्चेला पूर्णविराम मिळाला. दरम्यान, रितेश कुमार हे सोमवारी पदभार स्वीकारणार होते, मात्र त्यांनी शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजताच पोलिस आयुक्तालयात हजेरी लावून पदभार स्वीकारला.
सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात आले. उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले. त्यानंतर मावळते पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, रामनाथ पोकळे यांच्यासह सर्व परिमंडळाचे, विभागाचे पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यावेळी उपस्थित होते. रितेश कुमार यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्याशी संवाद साधला.