पुणे, 16 डिसेंबर 2022
आगामी लष्कर दिन संचलन बंगळुरू (कर्नाटक) येथे 15 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे.नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेण्यासाठीं आणि व्यापकपणे पाहता यावे या दृष्टीने, राष्ट्रीय महत्त्वाच्या कार्यक्रमांचे आयोजन राष्ट्रीय राजधानीबाहेर करण्याच्या निर्णयाशी सुसंगत राहून हे आयोजन करण्यात आले आहे. 15 जानेवारी 1949 रोजी भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ, फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांनी ब्रिटिश पूर्वसूरींची जागा घेत भारतीय लष्कराची औपचारिक सूत्रे हाती घेतली होती, यानिमित्त दरवर्षी 15 जानेवारी रोजी लष्कर दिन साजरा केला जातो. यंदा बंगळुरू येथे या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे दक्षिण भारतातील लोकांनी राष्ट्रासाठी दिलेले शौर्य, बलिदान आणि सेवा यांचा गौरव आहे तसेच कर्नाटकचे असलेले फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांनाही ही समयोचित आदरांजली आहे.
भारतीय लष्कराने, पुढील एक महिना , शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थी, दुर्गम गावे आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांसोबत कार्यक्रम आयोजित करून नागरिकांशी असलेले संबंध दृढ करण्यासाठी व्यापक जनसंपर्क मोहीम आखली आहे.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे बंगळुरू येथे हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करतील आणि 15 जानेवारी 23 रोजी होणाऱ्या लष्कर दिन संचलनाचे पुनरावलोकन करतील. या संचलनामध्ये, भारतीय लष्कराचा पराक्रम अधोरेखित करतानाच भविष्यातील सज्जतेसाठी तंत्रज्ञानावर आधारित, घातक आणि चपळ वेगवान दलामध्ये रूपांतरित करण्याच्या भारतीय लष्कराच्या प्रयत्नांचे दर्शन घडणार आहे. देशाच्या तरुण पिढ्यांना प्रेरित करण्यासाठी लष्करी संचलन तुकडी आणि लष्करी बँड सोबत, मोटार सायकल डिस्प्ले, पॅरा मोटर्स आणि कॉम्बॅट फ्री फॉल यांसारख्या साहसी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशासाठी लष्करी जवानांनी शौर्य आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान केल्याचा गौरव म्ह्णून लष्करप्रमुखांकडून शौर्य पुरस्कार आणि लष्कराच्या तुकड्यांना प्रशस्तिपत्रके प्रदान केली जातील. लष्कर दिन 2023 ची पूर्वतयारी म्हणून, 13 जानेवारी 23 रोजी बंगळुरू येथे दक्षिण कमांड पुरस्कार प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे., ज्यामध्ये दक्षिण कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल ए के सिंग लष्करी जवानांना विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान करतील.
भारतीय लष्कराची देश उभारणीत असलेली बांधिलकी दर्शविणाऱ्या कार्यक्रमांची मालिका पुढील एका महिन्यात दक्षिण कमांडच्या लष्करी तुकड्यांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांच्या सर्वांगीण सहभागासह आयोजित करण्यात आली आहे.विजय दिवसाच्या स्मरणार्थ 17 डिसेंबर 22 रोजी दक्षिणी स्टार विजय दौड – 2022 (संकल्पना – जवानांसाठी धावा – जवानांसह धावा) हा कर्टन रेझर कार्यक्रम होणार आहे. यामध्ये दक्षिण कमांडमधील 18 ठिकाणांवरील (जैसलमेर, जोधपूर, अहमदाबाद, भुज आणि अल्वर, भोपाळ, सिकंदराबाद, झाशी, ग्वाल्हेर, चेन्नई, बेंगळुरू, बेळगाव, वेलिंग्टन (टीएन), पुणे, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि मुंबई) 50,000 हून अधिक सहभागींना एकाच वेळी हिरवा झेंडा दाखवला जाईल.
त्यानंतर भारतीय लष्कराची देशाप्रती असलेली वचनबद्धता दर्शविणारे अनेक कार्यक्रम, स्थानिक संस्था आणि समाज यांच्या समन्वयाने आयोजित केले जातील त्याचा तपशील खालीलप्रमाणे :-
24 डिसेंबर 2022 : रक्तदान (संकल्पना : रक्तदान करा – जीवन वाचवा) गरजू रुग्णांसाठी 7,500 युनिट रक्त संकलन आणि 75,000 स्वैच्छिक रक्तदात्यांच्या डेटाचे संकलन
30 डिसेंबर 2022 : 75x दुर्गम / सीमावर्ती / कमी विकसित गावांमध्ये भारतीय सैन्याद्वारे जनसंपर्क कार्यक्रम (संकल्पना : ग्राम सेवा- राष्ट्र सेवा) यामध्ये वैद्यकीय शिबिरे, अग्निपथ योजना जागृती, वीर नारी आणि वीर माता यांचा सत्कार, स्वच्छता अभियान, क्रीडा सुविधांची निर्मिती -व्हॉलीबॉल / खो खो / कबड्डी आणि क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाईल.
07 जानेवारी 2023 : ‘विद्यांजली योजना, ज्यात क्रीडा पायाभूत सुविधा सामायिक करणे, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे आणि योग आणि इतर सुप्त कौशल्यांना प्रोत्साहन देणे यासांसारख्या परस्पर फायदेशीर विकास कार्यक्रम सामायिक आणि देवाणघेवाण करण्यासाठी आर्मी पब्लिक स्कूल 75 x सरकारी/सरकारी अनुदानित शाळांशी संलग्नता साधतील.
10 जानेवारी 2023 : 75 x अमृत सरोवर/तलाव (संकल्पना : जल – जीवन सुरक्षा) यांच्या पुनरुज्जीवनासाठी आणि पर्यावरणाच्या विकासासाठी कार्य
14 जानेवारी 2023 : ‘वृक्षरोपण’ (संकल्पना : पर्यावरण सुरक्षा) दक्षिण कमांड परिसरात हरित भारतासाठी 75,000 रोपांची लागवड.
लष्कर दिनाच्या (09 -15 जानेवारी 2023) आधीच्या आठवड्यात, शस्त्रे आणि उपकरणे प्रदर्शन, बँड सादरीकरण , प्रश्नमंजुषा स्पर्धा, चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धा, सायक्लोथॉन, शौर्य पुरस्कार विजेत्यांकडून प्रेरक भाषणे, प्रसिद्ध युद्धांचे सादरीकरण, युद्ध स्मारक/युद्ध संग्रहालयांना भेटी आणि ‘एक भारत सर्वश्रेष्ठ भारत’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम या अतिरिक्त उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
लष्कर दिन संचलनापर्यंत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे.