मुंबई. भारतातील धनकुबेर उद्योजक मुकेश अंबानी पुन्हा आशिया खंडातील सर्वात धनाढ्य व्यक्ती ठरले आहेत. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायंस जिओ आणि मार्क झुकरबर्ग यांच्या फेसबूकमध्ये डील झाल्यानंतर हा फरक पडला आहे. अंबानी यांनी अलीबाबाचे संस्थापक जॅक मा यांना देखील पिछाडीवर सोडले आहे. फेसबूकने या डीलसोबत मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 4 अब्ज अमेरिकेन डॉलरची भर टाकली आहे. त्यामुळे, अंबानींची संपत्ती वाढून 49.5 अब्ज डॉलर (जवळपास 3.77 लाख कोटी रुपये) एवढी झाली आहे. फेसबुक मुकेश अंबानी यांच्या कंपनीमध्ये 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीसह फेसबूकची जिओमध्ये 9.99% भागिदारी होणार आहे.
मुकेश अंबानी यांनी आशिया खंडातील सर्वात धनाढ्य राहिलेले उद्योजक जॅक मा यांना मागे टाकले. जॅक मा यांच्या तुलनेत मुकेश अंबानी यांची संपत्ती 3 अब्ज अमेरिकन डॉलरने अधिक आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीप्रमाणे, मंगळवारी 21 एप्रिल पर्यंत मुकेश अंबानी यांची संपत्ती 14 अब्ज अमेरिकन डॉलर पर्यंत खाली आली होती. तर मंगळवारी जॅक मा यांच्या संपत्तीमध्ये 1 अब्ज अमेरिकन डॉलरची घसरण झाली होती.
रिलायंसच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसंडी
फेसबूकसोबत डील केल्यानंतर रिलायंस इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये बुधवार कमालीची झेप पाहायला मिळाली. एकावेळी तर 11 टक्के चढ्या भावाने 1375 रुपयांवर ट्रेडिंग करत होते. बाजार बंद झाले त्यावेळी आरआयएलच्या शेअर्स 9.83 टक्के वाढीसह 1359 रुपयांवर बंद झाले. केवळ बुधवारीच रिलायंस इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 90,000 कोटी रुपयांनी वधारले होते. भारतीय कंपन्यांमध्ये एवढ्या कमी भागिदारीसह ही सर्वात मोठी थेट परदेशी गुंतवणूक मानली जात आहे. जिओ प्लॅटफॉर्मसाठी प्री मनी एंटरप्राइज व्हॅल्यू 66 अब्ज डॉलर राहील. गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू 4.62 लाख कोटी होणार आहे. या भागिदारीने भारतात रोजगार आणि बिझनेसच्या संधी निर्माण होतील.