पुणे, दि. 23 – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षित आणि आपुलकीने वाहतूक करणार्या रिक्षा-व्हॅनवाले काकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रिक्षापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सी. के. रघतवान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सुरक्षिततेसाठी कायद्याने घालून दिलेल्या वाहतूक नियमांची प्रत्येकाने अंमलबजावणी करावी असे आवाहन रघतवार यांनी केले. डीईएसच्या सुरक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे प्रदीप अष्टपुत्रे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक सुनील शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा दल (आरएसपी) विभाग प्रमुख माधवी पांढरकर, सागर कवडे, श्रेयस राशिनकर यांनी संयोजन केले.
एनईएमएसमध्ये देशभक्तिपर कार्यक्रम
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या एनईएमएस पूर्व-प्राथमिक शाळेत ‘माँ तुझे सलाम’ या देशभक्तिपर कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या नृत्यांतून भारत मातेला वंदन केले. विविधतेतून एकात्मतेचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतरचे सुराज्य जपण्याची, ज्ञानाची ज्योत पेटविण्याची आणि स्वच्छता राखण्याची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. गरवारे बालभवनच्या सल्लागार डॉ. विदुला म्हैसकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. शाला समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक पलांडे अध्यक्षस्थानी होते. मुख्याध्यापिका शिल्पा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाती मर्चंट, प्रतिभा गुरव आणि शिक्षकांनी संयोजन केले.