नसानसात नाटक भिनलेल्या अभिनेते प्रदीप पटवर्धन यांच्या आयुष्यात नाटकाच्या निमित्तानेच एक कोरून राहणारी गोष्ट घडली आहे. ज्या प्रदीप पटवर्धन यांची नाळ मराठी रंगभूमीशी वयाच्या दहाव्या वर्षापासून जुळली त्यांनी या जगाचा निरोप घेण्यापूर्वी नाट्यस्पर्धेचं परीक्षण करण्याचं जे काम केलं तेच त्यांच्या आयुष्यातील नाटकाशी जोडलेलं अखेरचं काम ठरलं. झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डसाठी नाटक विभागासाठी प्रदीप पटवर्धन यांनी जबाबदारी पेलली, या विभागातील नामांकन मिळालेल्या नाटकांतून सर्वोत्कृष्ट नाटक निवडत त्यांच्यातील पारखी रंगकर्मीचं दर्शन घडवलं. ९ ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रदीप पटवर्धन यांनी काळाच्या रंगभूमीवरून एक्झिट घेतली खरी पण त्याआधी एक रंगकर्मी परीक्षक म्हणून त्यांची भूमिका चोख पार पाडली.
शाळेत असतानाच प्रदीप यांना नाटकात काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यांच्या आई उषा पटवर्धन या नाटकात काम करायच्या. आईकडून आलेला हा अभिनयाच्या वारसा प्रदीप यांच्यामध्येही झिरपला होता. शालेय , महाविदयालयीन जीवनात नाटक हे प्रदीप यांचं वेड बनलं. पण हे क्षेत्र अस्थिर असल्याने या क्षेत्रात करिअर करू नये असं आईचं म्हणणं होतं. दरम्यान सुरूवातीला रिझर्व्ह बँक आणि त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करून प्रदीप यांनी नाटक, सिनेमा यामधून त्यांच्या अभिनयाचं दर्शन घडवलं. नाटक क्षेत्राविषयी नाखुश असलेल्या त्यांच्या आईंसाठी प्रदीप यांनी नोकरी आणि नाटक या दोन्हीमधील समतोल अगदी नीट सांभाळला. आई त्यांच्यासाठी सर्वस्व होती. आईच्या इच्छेकुसार त्यांची बँकेतली नोकरी सुरू झाली. आंतरबँक एकांकिका स्पर्धाही ते गाजवू लागले.
मुंबईतील गिरगावसारख्या भागात त्यांचं सारं आयुष्य गेलं. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडी यासह उत्सवात होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये प्रदीप यांच्यातील अभिनय फुलत गेला. १९७५ साली मोरूची मावशी या नाटकाने प्रदीप यांना व्यावसायिक रंगभूमीवर नाव मिळवून दिलं. या नाटकाचे त्यांनी ५०० प्रयोग केले. त्यानंतर त्यांची कारकीर्द बहरतच गेली. या नाटकातील त्यांची भैया पाटील ही भूमिका खूपच गाजली. विनोदाचं टायमिंग त्यांना गवसलं. संवादफेक ही त्यांची खासियत होती. अशोक सराफ, सचिन पिळगावकर, प्रशांत दामले यांच्यासोबत प्रदीप पटवर्धन हे नाव मराठी मनोरंजन क्षेत्रात नावारूपाला आलं. एक दोन तीन चार, चष्मेबहदूर, नवरा माझा नवसाचा, , एक शोध, भुताळलेला, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, एक फुल चार हाफ, थँक्यू विठ्ठला, पोलिस लाइन , गोळा बेरीज, डान्स पार्टीण् परीस हे प्रदीप पटवर्धन यांचे गाजलेले सिनेमे.
प्रदीप पटवर्धन यांनी नाटकासाठी खूप संघर्ष केला. सुरूवातीच्या काळात व्यावसायिक नाटकांमध्ये काम मिळवण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम जेव्हा त्यांना मिळाला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. मोरूची मावशीसाठी तर त्यांनी पायाला भिंगरी बांधली. पण एका अपघातामुळे त्यांना हे नाटक सोडावं लागलं.
प्रदीप पटवर्धन हा सामान्यांचा चेहरा होता. अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत गिरगावकर म्हणूनच ते जगले. गिरगावच्या झावबावाडीत दहीहंडीच्या उत्सवात गिरगावचा हा पट्या भान हरपून नाचायचा. प्रदीप यांचा चेहरा म्हणूनच सर्वसामान्यांना आपला वाटायचा. मी कलाकार आहे तो स्टेजवर, एरवी मी सर्वसामान्य माणूच आहे असं प्रदीप नेहमी म्हणायचे.
झी टॉकीज कॉमेडी अॅवार्ड सोहळ्याची घोषणा करण्यात आली तेव्हा नाटक या विभागातील नामांकनांतून योग्य नाटकाची निवड करण्यासाठी परीक्षक म्हणून झी टॉकीजने प्रदीप पटवर्धन यांच्याशी संपर्क साधला. प्रदीप हे जितके कसलेले नाट्यकलावंत होते तितकेच ते नाटकातील हिऱ्यांची पारख करणारे परीक्षकही होते. नाटक कसं पहावं याच मानबिंदू असलेला प्रेक्षकही त्यांच्यात नेहमी सजग असायचा. नाटक हा विषय जरी निघाला की त्यावर किती बोलू आणि किती नको इतके ते नाटकासाठी वेडे होते. त्यांनी सिनेमा हे माध्यम बदलत्या काळानुरूप स्वीकारलं असलं तरी त्याचं पहिलं प्रेम, आस्था, जिव्हाळा हा नाटक हाच होता. मग झी टॉकीजसारख्या वाहिनीसाठी नाटक या विभागातील पुरस्कारांसाठी नाटकाची, रंगकर्मीची निवड करण्याची संधी त्यांच्याकडे आली तेव्हा नकार देण्याचा प्रश्नच नव्हता. प्रदीप पटवर्धन यांना झी टॉकीजने झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डसाठी विनोदी नाटकांसाठी नामांकन ते पुरस्कारयोग्य कलाकारांची नावं निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सामावून घेतले. आजवरच्या अनुभवाची सगळी शिदोरी पणाला लावत प्रदीप पटवर्धन यांनी झी टॉकीज या वाहिनीतर्फे देण्यात येणाऱ्या कॉमेडी नाटक या विभागातील पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून काम पाहिलं. प्रदीप यांच्या पारखी नजरेने वेचलेले हे नाट्य हिरे लवकरच झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डच्या मंचावर गौरवले जाणार आहेत. पण ज्यांची निवड केली त्यांना पुरस्कार घेताना पाहणारे, आनंदाने टाळया वाजवणारे, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे प्रदीप पटवर्धन मंचासमोरील गर्दीत नसतील. आयुष्यभर नाटक जगणारा हा अवलिया त्याच्या आयुष्यातील शेवटचं कामही नाटकाचे परीक्षक म्हणून करून गेला, यापेक्षा एखादया क्षेत्रासाठी वाहून जाणं म्हणजे काय असतं याची प्रचिती येईल.

रंगकर्मी प्रदीप पटवर्धन यांनी झी टॉकीज कॉमेडी अॅवार्डसाठी केले अखेरचे नाट्य परीक्षण !
About the author

SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/