मुंबई- येथे पार पडलेल्या ‘आइस अॅवॉर्ड-2016’ या जागतिक दर्जाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ‘वनराई’ मासिकाच्या वार्षिक विशेषांकाला प्रतिष्ठेचे दोन पुरस्कार प्राप्त झाले. ‘वनराई’चे कार्यकारी संपादक श्री. अमित वाडेकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले. याप्रसंगी प्रसिद्ध गझलसम्राट अनुप जलोटा, ‘दूरदर्शन’वर ‘सुरभी’ या गाजलेल्या मालिकेचे निर्माते व सादरकर्ते सिद्धार्थ काक, ज्येष्ठ पत्रकार श्रीमती उदयतारा नायर, श्रीमती तारा रविंद्रनाथन, प्रसिद्ध पत्रकार व लेखक आनंद निलकंठन, ज्येष्ठ उद्योजक श्री. प्रताप नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
सलग गेली पाच वर्षे जागतिक दर्जाचा ‘आइस अॅवॉर्ड’ पटकावून ‘वनराई’ मासिकाने एक प्रकारचा विक्रमच केला आहे. डॉ. मोहन धारिया यांनी स्थापन केलेल्या ‘वनराई’ संस्थेच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून ‘वनराई’ मासिक प्रसिद्ध केले जाते. पर्यावरण व ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील अग्रगण्य मासिक म्हणून ‘वनराई’ची ख्याती आहे. ‘वनराई’ मासिकाचा वार्षिक विशेषांक दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने प्रकाशित केला जातो. मागील वर्षी ‘स्वच्छतेसाठी जनआंदोलन’ या विषयावर विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला. या विशेषांकाला ‘Best Magazine Among NGO’ (स्वयंसेवी संस्थेकडून प्रकाशित केले जाणारे सर्वोत्कृष्ट मासिक) आणि ‘Best Magazine among Regional Languages’ (प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित होणार्या मासिकांपैकी सर्वोत्कृष्ट मासिक) या दोन विभागांमध्ये ‘आइस अॅवॉर्ड-2016’ पुरस्कार प्राप्त झाले. याअगोदर याच विशेषांकाला ‘महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघा’चा ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक’, ‘रोटरी लोकमान्य गौरव पुरस्कार’, ‘साप्ताहिक उल्हास प्रभात राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक’ आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
मुद्रित नियतकालिकांना विशेषतः प्रस्थापित किंवा मुख्य प्रवाहातील व्यावसायिक मासिकांव्यतिरिक्तच्या मासिक अंकातील कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘शैलजा नायर फाउंडेशन’च्या वतीने ‘आइस अॅवॉर्ड’ हा पुरस्कार देण्यात येतो. विविध भागांतून आणि प्रादेशिक भाषांमधून प्रसिद्ध होणार्या जगभरातील वैशिष्ट्यपूर्ण मासिकांना ‘आइस अॅवॉर्ड’ या पुरस्काराने गौरविण्यात येते.