पुणे -चारचाकी आणि दुचाकी वाहनांची चोरी करणा-या टोळीला गुंडास्कॉड उत्तर विभागाच्या पथकाने गजाआड केले आहे . ही कारवाई नुकतीच चिखली मोशी रोडवर करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून बारा गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून ३ चारचाकी आणि ७ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. ज्यांची पोलीस्दार्बारी १५ लाख रुपये नोंद करण्यात आली आहे .
शुभम राजेंद्र तरस (वय-२१, रा. देहूरोड), गणेश अशोक पुरी (वय-१९, रुपीनगर, निगडी) दिलीप नागेश भवारी (वय-२३, रा. मेदनकर वाडी, चाकण), योगेश रघुनाथ तळपे (वय-२८ रा. अहमदनगर), वैभव दिलीप काळे (वय-२३ रा. चाकण), धननाथ उर्फ भावड्या काशिनाथ भावनाथ (वय-२२ रा. चाकण) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, गुन्हे प्रदिप देशपांडे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-२ भानुप्रताप बर्गे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, पोलीस उप निरीक्षक पोपटराव गायकवाड, कर्मचारी तानाजी गाडे, राजनारायण देशमुख, किरण चोरगे, भालचंद्र बोरकर, राजु मोरे, दिपक भुजबळ, निलेश शिवतरे, रमेश भिसे, अतुल मेंगे, प्रदिप शेलार, दत्ता फुलसुंदर, नरेंद्र सोनवणे, नवनाथ चांदणे, कांतिलाल बनसोडे, विष्णु पांडुळे, शितल शिंदे यांनी केली.
हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वाहन चोरी गुन्ह्यातील, आणि देहूरोड पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी आणि त्याचे साथिदार चिखली मोशी रोडवर चोरीचा महिंद्रा पिक अप टेम्पो विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस नाईक तानाजी गाडे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांनी स्टाफसह चिखली मोशी रोडवर सापळा रचला. दरम्यान, एक महिंद्रा कंपनीचा मॅक्स टेम्पो (एमएच १६ डीएन ०११८) हा चिखली रस्त्याच्या कडेला उभा असलेला दिसला. पोलिसांनी टेम्पो आणि आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता टेम्पो हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबूली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून एक महिंद्रा कंपनीचा मॅक्स टेम्पो, एक अशोक लेलेंड कंपनीचा टेम्पो, बोलेरो जीप तसेच ७ वेगवेगळ्या कंपन्यांच्या दुचाकी जप्त केल्या. गुंडास्कॉड उत्तर विभागाच्या पोलिसांनी केलेल्या या कारवाईत देहूरोड, पिंपरी, नारायण गाव, घारगाव, आळेफाटा, चाकण, हिंजवडी, सिन्नर या पोलीस ठाण्यात दाखल असलेले १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरपी पैकी शुभम राजेंद्र तरस हा देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुन आणि अपहरणाच्या गुन्ह्यात फरारी होता. तर गणेश पुरी हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मारहाणीच्या गुन्ह्यात फरार होता.