पुणे -भाजपकडून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) योजना रद्द करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आज येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी केला .
शहर काँग्रेस जिल्हा कमिटी साप्ताहिक बैठक,आज येथे पार पडली.या वेळी बोलताना बागवे म्हणाले ” राज्यातील भाजप सेना सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) योजना रद्द करण्याचे प्रयत्न चालू आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) हि योजना काँग्रेस सरकारने १९७१ साली झोपडपट्टी धारकांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी सुरु करण्यात आली. अन्नसुरक्षा योजना सुद्धा काँग्रेस सरकारच्या काळात झाली पण त्यासाठी लागणाऱ्या निधीत हे सरकार कपात करत आहे. शहरात ४२% जनता झोपडपट्टीत राहते ज्या मध्ये मुख्यतः दलित, बहुजन, अल्पसंख्यांक लोक राहतात. त्यांना विचारात न घेता हे सर्व कटकारस्थान या सरकारने चालू केले आहे. काँग्रेस पक्ष गोरगरीब जनतेच्या हक्कांसाठीच्या लढ्यात सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील.”
यापुढे ते म्हणाले ”आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने बूथ कमिटी पातळीवर आपण अधिक काम केले पाहिजे. महिला काँग्रेसला अधिक सक्रिय करण्याच्या दिशेने महिला मेळावे घेण्याचे नियोजन आहे. ”काँग्रेस संदेश” हे अखिल भारतीय कमिटीचे अधिकृत मासिक आहे तर ते सर्व कार्यकर्त्यांनी नियामित वाचावे. काँग्रेस पक्ष निष्ठावंतांची नेहमीच दाखल घेतो त्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची मी ग्वाही देतो. नुकत्याच होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्ष स्वबळावर लढत आहे आणि असे चित्र तुम्हाला पुणे महानगर पालिकेत दिसेल, त्यामुळे सर्वानी जोमाने कामाला लागावे.”
माजी नगरसेविका. अंजनीताई निम्हण यांचा पंचाहत्तरवा वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी प्रदेश प्रवक्ते डॉ. सतीश देसाई, शहर उपाध्यक्ष अजित दरेकर,सदानंद शेट्टी,. मुक्तार शेख, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष,विकास लांडगे,काका धर्मावत, नगरसेवकअविनाश बागवे, रईस सुंडके, सरचिटणीस निलेश बोराटे व इतर सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.