पुणे : पंचतारांकीत हॉटेलमधील डोळे दिपविणारा थाट….उच्चभ्रू लोकांची ये- जा पाहताना भांबावलेले चिमुकले… आदरातिथ्याने वागविणारे हॉटेलचे कर्मचारी…हे सर्व जवळून पाहताना श्रीमंती थाटात सुग्रास जेवणाचा घेतलेला आस्वाद…. एचआयव्ही सारख्या व्याधीमुळे खडतर आयुष्य जगताना या निरागस मुलांना आयुष्यभर जपून ठेवता येईल असा आनंद मिळाला.
निमित्त होते, सामाजिक कार्यकर्त्या मोनिका वढेरा-पूनावाला यांनी मानव्य संस्थेतील एचआयव्हीग्रस्त तसेच अनाथ मुलांसाठी पंचतारांकीत हॉटेलमधील जेवणाचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह, अमृता राय, युवानेते तेहसीन पूनावाला,शहराध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र काँग्रेस समितीचे सचिव शहजाद पूनावाला, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, अभय छाजेड, गोपाळ तिवारी, सुभाष सिन्हा, फर्ज खान, यशवंत हात्ते उपस्थित होते. मागील पाच वर्षांपासून विविध शहरांमध्ये प्रत्येक महिन्याला उपक्रमाचे आयोजन केले जाते. समाजातील उपेक्षित घटकांना किमान सोईंची भा्रंत असताना मोठी स्वप्ने पूर्ण होणे जवळजवळ अशक्यच. परंतु या मुलांना आयुष्यात एकदातरी पंचतारांकीत हॉटेल पाहता यावे, त्यातील विविध पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेता यावा यासाठी उपक्रमाचे आयोजन केले होते.
दिग्विजय सिंह म्हणाले, उपेक्षित मुलांचे आयुष्य खडतर आव्हानांनी भरलेले असते. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण यावेत, यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. त्यांनी प्रत्येक क्षण उत्स्फूर्तपणे जगायला हवा. गांधी आणि वढेरा परिवाराला समाजसेवेची मोठी परंपरा लाभली आहे. त्याप्रमाणे आजही त्यांचे कार्य सुरु आहे. उपेक्षित मुलांशी संवाद साधून आनंद झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोनिका वढेरा- पूनावाला म्हणाल्या, माझ्या कुटुंबियांनी नेहमीच विधायक कामे करण्याची शिकवण दिली आहे. आयुष्य भरभरून जगावं आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपण असे आयुष्य जगतो. परंतु उपेक्षित मुलांच्या वाटेला देखील हा आनंद यावा, यासाठी या उपक्रमाचे आयोजन दरवर्षी केले जाते. समाजातील सबळ घटकांनी उपेक्षितांसाठी मदतीचा हात पुढे करायला हवा. दिग्विजय सिंह यांनी भेट देऊन मुलांशी संवाद साधला त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन नक्कीच प्रेरणादायी ठरेल, असेही त्या म्हणाल्या. अॅड. गफूर पठाण यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.